अखेर कपिल देव यांचे प्रयत्न फळाला आले आहेत. भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं (बीसीसीआय) माजी क्रिकेटपटू अंशुमन गायकवाड यांच्यासाठी मदतीचा हात पुढे केला आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी कर्करोगाशी लढा देत असलेल्या अंशुमन गायकवाड यांच्यासाठी 1 कोटी रुपयांची मदत जाहीर केली.
जय शाह यांनी कर्करोगाशी झुंज देत असलेले अंशुमन गायकवाड यांला आर्थिक मदत देण्यासाठी बीसीसीआयला तात्काळ एक कोटी रुपये देण्याचे निर्देश दिले आहेत. यासह शाह यांनी गायकवाड यांच्या कुटुंबीयांशीही बोलून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.
भारताचे विश्वविजेते कर्णधार कपिल देव यांनी बीसीसीआयला रक्ताच्या कर्करोगानं ग्रस्त असलेल्या अंशुमन गायकवाड यांना मदत करण्याचं आवाहन केलं होतं. 71 वर्षीय गायकवाड यांच्यावर गेल्या एक वर्षापासून लंडनच्या किंग्ज कॉलेज हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. बीसीसीआयला मदतीची विनंती करण्याव्यतिरिक्त कपिल देव यांनी गायकवाड यांच्या उपचारासाठी आपली पेन्शन दान करण्याचंही आश्वासन दिलं होतं. आता बीसीसीआयनं कपिल देव यांच्या मागणीची दखल घेतली आहे.
अंशुमन गायकवाड भारताकडून दीर्घकाळ खेळले असून ते टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षकही राहिले आहेत. कपिल देव यांनी बीसीसीआयला आवाहन करताना म्हटलं होतं की, “बीसीसीआयमध्ये अशी व्यवस्था निर्माण करावी, जेणेकरून माजी क्रिकेटपटूंना अशा परिस्थितीत मदतीची गरज भासल्यास बोर्डानं त्यांना मदत करावी. क्रिकेटमध्ये आता जेवढे पैसे मिळत आहेत, त्यावेळी एवढे पैसे मिळत नव्हते. यामुळे अनेक माजी क्रिकेटपटू महागडे उपचार घेण्याइतके आर्थिकदृष्ट्या सक्षम नाहीत.”
अंशुमन गायकवाड यांना रक्ताचा कर्करोग झाल्याची बातमी त्यांचे सहकारी संदीप पाटील यांनी या महिन्याच्या सुरुवातीला दिली होती. गायकवाड एक वर्षापासून या आजाराला झुंज देत असून ते उपचारासाठी लंडनमध्ये आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
भारताच्या माजी क्रिकेटपटूला कर्करोगानं ग्रासलं, कपिल देव यांची बीसीसीआयकडे मदतीची याचना
रिकी पाँटिंगनंतर दिल्ली कॅपिटल्सचा मुख्य प्रशिक्षक कोण बनेल? सौरव गांगुलीनं केला खुलासा
असा खेळाडू पुन्हा होणे नाही; युवराज सिंगने क्रिकेट करिअरमध्ये जिंकल्या चक्क इतक्या ट्राॅफ्या! एकदा पाहाच