Duleep Trophy :- भारताच्या बांगलादेश दौऱ्यापूर्वी स्टार क्रिकेटपटू दुलीप ट्रॉफी स्पर्धेत खेळताना दिसणार आहेत. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) बुधवारी (14 ऑगस्ट) दुलीप ट्रॉफी 2024-25 च्या पहिल्या फेरीसाठी संघांची घोषणा केली. शुभमन गिल, अभिमन्यू ईश्वरन, ऋतुराज गायकवाड आणि श्रेयस अय्यर यांच्याकडे या स्पर्धेतील संघांची कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. ही स्पर्धा 5 सप्टेंबर 2024 पासून सुरू होणार आहे.
दुलीप ट्रॉफीमध्ये विराट कोहली आणि रोहित शर्मासह काही सीनियर खेळाडू खेळताना दिसतील, अशा चर्चा होत्या. मात्र, विराट कोहली, रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराह यांची नावे संघात दिसली नाहीत. आता बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी कोहली आणि रोहित देशांतर्गत स्पर्धा का खेळणार नाहीत? यामागचे कारण सांगितले आहे.
ऑस्ट्रेलिया मालिकेवर लक्ष केंद्रित करा
बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी आता सांगितले आहे की, रोहित आणि विराट या वर्षाच्या अखेरीस ऑस्ट्रेलियात होणाऱ्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी तंदुरुस्त असणे हे आमचे प्राधान्य आहे. टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना शाह म्हणाले, “रोहित-कोहली व्यतिरिक्त इतर सर्वजण खेळत आहेत. तुम्ही त्यांचे कौतुक केले पाहिजे. हे लक्षात घ्यावे की इशान किशन आणि श्रेयस अय्यर बुची बाबू स्पर्धेतही खेळत आहेत.”
बीसीसीआयचे सचिव म्हणाले, “आम्ही रोहित शर्मा आणि विराट कोहली यांसारख्या खेळाडूंना दुलीप ट्रॉफीमध्ये खेळण्यास भाग पाडू शकत नाही. त्यांना दुखापतीचा धोका असेल. जर तुम्ही लक्षात घेतले असेल की, प्रत्येक आंतरराष्ट्रीय खेळाडू ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमध्ये देशांतर्गत क्रिकेट खेळत नाही. आम्हाला हे करावे लागेल. खेळाडूंना आदराने वागवावे लागते.”
दरम्यान बांगलादेशचा संघ पुढील महिन्यात भारत दौऱ्यावर येणार आहे. या कालावधीत दोन्ही संघांमध्ये 2 कसोटी सामने खेळवले जाणार आहेत. स्टार यष्टीरक्षक रिषभ पंत दुलीप ट्रॉफी खेळत आहे. अशा परिस्थितीत बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेत त्याला संधी मिळण्याची शक्यता आहे. पंत बऱ्याच काळापासून कसोटी क्रिकेटपासून दूर आहे. 2022च्या शेवटी रस्ता अपघात झाल्यापासून तो एकही कसोटी खेळलेला नाही.