चेन्नई: गेल्या मोसमात शेवटून दुसऱ्या स्थानावर फेकले गेलेल्या चेन्नईयीन एफसीने यंदा हिरो इंडियन सुपर लिगचा कालावधी आणि आव्हाने जास्त असूनही बाद फेरीत मुसंडी मारली. साहजिकच त्यांची वाटचाल जल्लोष करण्यासारखी आहे.
यंदाच्या कामगिरीसह माजी विजेत्या चेन्नईयीनने प्रमुख संघांमधील प्रतिष्ठेचे स्थान पुन्हा मिळविले आहे. अर्थात यानंतर आव्हान आणखी खडतर होणार याची चेन्नईयीनला जाणीव आहे. दुसऱ्या आयएसएल विजेतेपदाच्या मार्गात चेन्नईयीनला एकच चिंता असू शकेल आणि ती म्हणजे स्टार स्ट्रायकर जेजे लालपेखलुआ याने गमावलेला फॉर्म.
यंदाच्या लिगमध्ये आघाडीचा स्ट्रायकर म्हणून पसंती मिळालेला तो एकमेव भारतीय आहे. आतापर्यंतचा मोसम मात्र त्याच्यासाठी संमिश्र ठरला आहे. पहिल्या तीन सामन्यांत त्याचे खाते रिक्त राहिले. पुढील नऊ सामन्यांत त्याने सात गोल नोंदविले. मग पाच सामन्यांत त्याला पुन्हा गोलसाठी झगडावे लागले. यात त्याने दवडलेल्या पेनल्टी किकचाही समावेश होता.
बाद फेरीतील स्थान नक्की झाल्यामुळे जेजेला अखेरच्या लढतीत मुंबई सिटी एफसीविरुद्ध विश्रांती देण्यात आली, पण कट्टर प्रतिस्पर्धी एफसी गोवाविरुद्ध उपांत्य फेरीत तो पुन्हा सक्रीय होईल हे नक्कीच आहे. आपला स्टार स्ट्रायकर योग्य वेळी फॉर्मात येईल असाच धावा चाहते करीत असतील. अपेक्षित कामगिरी करून दाखविण्यासाठी जेजेला सुद्धा या महत्त्वाच्या टप्यामुळे प्रेरणा मिळू शकेल.
जेजेने पूर्वी एका मुलाखतीत सांगितले होते की, आघाडीचा स्ट्रायकर भारतीय असलेला चेन्नईयीन एफसी हा एकमेव संघ आहे. लीगला प्रारंभ झाला तेव्हा संघासाठी माझ्याकडे हे आव्हान सोपविण्यात आले, कारण इतर संघांकडे परदेशी स्ट्रायकर होते, जे गोल करीत होते.
मिझोराममध्ये जन्मलेला जेजे हा लिगच्या प्रारंभापासून निष्ठावान सेवेकरी ठरला आहे. तेव्हापासून त्याने लौकीक वृद्धिंगत केला असून तो राष्ट्रीय संघातही पहिल्या पसंतीचा स्ट्रायकर बनला आहे. चेन्नईयीनने 1.3 कोटी रुपयांचे विक्रमी वेतन देत त्याला कायम ठेवण्याचा निर्णय घेतला तेव्हा कुणालाच आश्चर्य वाटले नाही. त्याला स्थानिक खेळाडूंच्या ड्राफ्टमध्ये जाऊ दिले असते तर प्रतिस्पर्धी क्लब त्याला पटकावू शकले असते.
जेजे हा आधीच्या तिन्ही लिगमध्ये चेन्नईयीनसाठी सर्वाधिक गोल करणारा भारतीय खेळाडू होता. 2014 मध्ये चार, 2015 मध्ये सहा, तर 2016 मध्ये तीन गोल अशी कामगिरी त्याने केली, पण संघाकडून सर्वाधिक गोल करणारा खेळाडू तो कधीच होऊ शकला नव्हता. याचे कारण एलॅनो ब्लुमर, स्टीव्हन मेंडोझा आणि डुडू ओमाग्बेमी असे नामवंत असताना त्याला प्रामुख्याने सहाय्यकाच्या भूमिकेत खेळविण्यात आले, ज्यामुळे जास्त गोल करणे शक्य नव्हते.
राष्ट्रीय संघासाठी सुद्धा त्याच्या जोडीला सुनील छेत्री होता. गोल करण्याची जबाबदारी पेलण्यास आणि त्याद्वारे येणाऱ्या दडपणाला सामोरे जाण्यास जेजेच्या साथीला तो होता.
2017-18च्या मोसमात जॉन ग्रेगरी यांनी गोल करण्याची सर्व जबाबदारी जेजेकडे सोपविली. प्रामाणिकपणे सांगायचे झाले तर त्याने ही जबाबदारी चांगली पार पाडली आहे. सात गोल ही त्याची आयएसएलमधील सर्वोत्तम कामगिरी आहे. सहाय्यक नव्हे तर आघाडीच्या स्ट्रायकरची भूमिका बजावण्यासाठी त्याला आपल्या खेळात योग्य बदल करावा लागला.
आता एफसी गोवाविरुद्धची उपांत्य फेरी नजिक आली असताना ग्रेगरी आणि त्यांच्या संघाला जेजेकडून पुन्हा गोलची प्रतिक्षा आहे. कारकिर्दीत पूर्वी अॅरोज, धेंपे स्पोर्टस क्लब किंवा मोहन बागानकडून खेळताना जेजेने गोलची क्षमता आणि कौशल्य प्रदर्शित केले होते. आता त्याला ही मदार एकहाती पेलावी लागणार आहे.