महिला तिरंगी टी २० मालिकेत आज भारताची युवा फलंदाज जेमिमा रोड्रिगेजने ऑस्ट्रेलियाविरुद्ध अर्धशतक केले आहे. या अर्धशतकाबरोबरच तिने आज खास विक्रमही रचला आहे.
ती आंतराष्ट्रीय टी २० मध्ये अर्धशतक करणारी दुसऱ्या क्रमांकाची सर्वात कमी वयाची खेळाडू ठरली आहे. तिचे आजचे वय १७ वर्षे आणि २०२ दिवस एवढे आहे. या यादीत विंडीजची स्टीफनी टेलर अव्वल स्थानावर आहे. तिने १७ वर्षे १६ दिवस एवढे वय असताना जून २००८ मध्ये आंतराष्ट्रीय टी २० मध्ये शतक केले होते.
आज जेमिमाने ४१ चेंडूत ५० धावांची खेळी केली. यात तिने ८ चौकारांची बरसात केली. मात्र तिला भारताच्या बाकी फलंदाजांकडून पाहिजे तशी साथ मिळाली नाही. त्यामुळे भारताने आज ऑस्ट्रेलिया विरुद्धचा सामना ३६ धावांनी गमावला.
ऑस्ट्रेलियाकडून मेगन शटने हॅट्ट्रिक घेतली. तिच्या या हॅट्ट्रिकमुळे ऑस्ट्रेलियाने सामन्यावर पकड मिळवली होती. आज ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना भारतासमोर १८७ धावांचे आव्हान ठेवले होते. त्यांच्याकडून बेथ मुनी आणि एलिस विलानीने अर्धशतक केले.
या पराभवामुळे मात्र भारताचे तिरंगी टी २० मालिकेतील आव्हान संपुष्ठात आले आहे. भारताला या मालिकेत अजून एकही विजय मिळवता आलेला नाही. त्यांचा या मालिकेतील शेवटचा सामना २९ मार्चला इंग्लंड विरुद्ध होणार आहे.
कमी वयात आंतराष्ट्रीय टी २० मध्ये अर्धशतक करणाऱ्या महिला क्रिकेटपटू:
स्टीफनी टेलर(विंडीज) – वय: १७ वर्षे १६ दिवस – २००८
जेमिमा रोड्रिगेज(भारत) – वय: १७ वर्षे २०२ दिवस – २०१८
बिस्माह मारुफ(पाकिस्थान) – वय:१७ वर्षे ३२९ दिवस – २००९
डीनड्रा डॉटीन(विंडीज) – वय:१७ वर्षे ३५८ दिवस – २००९