---Advertisement---

लई वाईट झालं! पदार्पणाच्या आंतरराष्ट्रीय सामन्यात ‘हा’ विडिंज क्रिकेटर घायाळ, ऍम्बुलन्सने नेले रुग्णालयात

On: रविवार, नोव्हेंबर 21, 2021 7:10 PM
---Advertisement---

वेस्ट इंडिजचा संघ २ कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी श्रीलंका दौऱ्यावर गेला आहे. दोन्ही देशांदरम्यान रविवार (२१ नोव्हेंबर) पासून गॉल येथे मालिकेतील पहिली कसोटी सुरू होत आहे. मात्र पहिल्याच दिवशी मैदानावर मोठा अपघात झाला. वेस्ट इंडिजकडून पदार्पण करणाऱ्या जेरेमी सोलोझानोला फॉरवर्ड शॉर्ट लेगवर क्षेत्ररक्षण करताना दुखापत झाली. यानंतर त्याला स्ट्रेचरवर मैदानातून बाहेर नेण्यात आले. ही घटना सामन्याच्या चोविसाव्या षटकात घडली.

सामन्यातील चोविसावे षटक वेस्ट इंडिजचा फिरकी गोलंदाज रोस्टन चेस टाकत होता आणि श्रीलंकेचा कर्णधार दिमुथ करुणारत्ने स्ट्राइकवर होता. चेसच्या षटकातील चौथा चेंडू थोडा आखूड होता. यावर दिमुथने जोरदार पुल शॉट मारला. फॉरवर्ड शॉर्ट लेगवर क्षेत्ररक्षण करणाऱ्या सोलोझानोच्या हेल्मेटवर चेंडू जाऊन आदळला. करुणारत्नेने इतका जोरदार पुल शॉट खेळला की सोलोझानोच्या हेल्मेटचा मागचा भाग निघून तो जमिनीवर पडला.

सोलोझानो जमिनीवर पडताच फिजिओने मैदानात धाव घेतली आणि त्याच्यावर प्राथमिक उपचार केले. त्यांनी त्याचे डोके टॉवेलने दाबले होते. त्यावेळी संपूर्ण वेस्ट इंडिज क्रिकेट संघ आणि श्रीलंकेच्या फलंदाजांच्या चेहऱ्यावर भीती स्पष्टपणे दिसत होती. आपल्या खेळाडूला दुखापत झाल्याचे पाहून प्रशिक्षक फिल सिमन्स यांनीही लगेचच ड्रेसिंग रूममधून मैदान गाठले. मात्र, फिजिओच्या उपचारानंतरही सोलोझानोच्या प्रकृतीत विशेष सुधारणा झाली नाही. त्यानंतर त्याला रुग्णालयात नेण्यात आले.

वेस्ट इंडिज क्रिकेटने ट्विट करून जेरेमी सोलोझानो हॉस्पिटलमध्ये स्कॅन करण्यात आल्याची माहिती दिली आहे. त्यांनी म्हटले की, ‘त्याच्या डोक्याला कोणतेही मोठे नुकसान झालेले नाही. त्याला रात्रभर रुग्णालयात निरीक्षणासाठी ठेवण्यात येणार आहे. आम्ही त्याच्या प्रकृतीबाबत माहिती देत राहू.’

या कसोटी सामन्यात श्रीलंकेचा कर्णधार दिमुथ करुणारत्ने याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. कर्णधार करुणारत्ने आणि पथुम निशांक यांनी श्रीलंकेला चांगली सुरुवात करून दिली. दोघांनी अर्धशतके पूर्ण केली. पहिल्या विकेटसाठी या दोन्ही फलंदाजांमध्ये १०० हून अधिक धावांची भागीदारी झाली होती.

महत्त्वाच्या बातम्या-

अभूतपूर्व कामगिरी! एकाच डावात १० बळी घेत आफ्रिकेचा अष्टपैलू आला प्रसिद्धीझोतात

टी२० मालिकेनंतर ‘हे’ दोघे करणार दक्षिण आफ्रिकेला प्रयाण; शार्दुलचाही होऊ शकतो समावेश

ईडन गार्डन्सवर भारतीय संघ आहे सरस! अशी राहिली आहे कामगिरी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---