सध्या जगभरात कोरोना या आजारामुळे लोकांचे जनजीवन विस्कळीत झालेले दिसून येते. त्याचबरोबर अनेक खेळाडूंना देखील या आजाराचा फटका बसत आहे. झारखंडचा राष्ट्रीय पातळीवरील दिव्यांग क्रिकेटपटू जितेंद्र पटेल याला या काळात आर्थिक संकटाचा सामना करावा लागतोय. जितेंद्र हा गेल्या नऊ वर्षांपासून क्रिकेट, जलतरण, नृत्य आणि व्हॉलीबॉलमध्ये राज्याचे नाव उज्ज्वल करतोय. त्याला आठ भावंडे आहेत, त्यापैकी चार विवाहित आहेत. कमकुवत आर्थिक परिस्थितीमुळे जितेंद्र फक्त बारावीपर्यंत शिक्षण घेऊ शकला. खेळांबरोबरच कोलकाता, मुंबई, दिल्ली, उत्तर प्रदेशसह अनेक ठिकाणी नृत्यातही त्याने आपली कला दाखविली.
खेळाडूंसाठी प्रोत्साहन भत्ते उपलब्ध
दिव्यांग खेळाडूंसाठी राज्य सरकारतर्फे दोन योजना चालवल्या जात असल्याचे राज्य दिव्यांग आयुक्त सतीश चंद्र यांनी सांगितले. ते म्हणाले, “अशा खेळाडूंसाठी पहिली योजना स्वामी विवेकानंद स्वावलंबन उत्सव योजना असून त्यामध्ये दिव्यांग खेळाडूंना दरमहा १००० रुपये देण्याची तरतूद आहे. या प्रोत्साहन भत्त्याचा फायदा जितेंद्र पटेल यांना होईल. त्याचबरोबर दुसर्या योजनेत अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत धान्य देण्याची तरतूद आहे.”
चंद्र यांनी पुढे बोलताना सांगितले, “राज्य निधीवरही झारखंड राज्य सरकार विचार करत आहे. या माध्यमातून ५० हजार ते एक लाख रुपये प्राधान्याच्या आधारे स्वरोजगारासाठी खेळाडूंना देण्यात येतील. याची सुरूवात या आर्थिक वर्षात होऊ शकेल. राष्ट्रीय व राज्यस्तरीय दिव्यांग खेळाडूंनाही नोकरी मिळावी या मागणीसाठी मी क्रीडा विभागाला पत्र लिहिले होते. मात्र, याबाबत राज्य सरकारकडून अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही. सरकार सध्या सामान्य खेळाडूंना नोकर्या देत आहे.”
आंतरराष्ट्रीय स्तरावर झळकावले झारखंडचे नाव
जितेंद्र याने अनेक वेळा क्रिकेट आणि जलतरणात राज्याचे प्रतिनिधित्व करीत बऱ्याच स्पर्धा जिंकल्या आहेत. त्याने राष्ट्रीय जलतरण पदकासह व्हॉलीबॉलमध्ये सुवर्णपदकही जिंकले आहे, परंतु दुर्दैवाने अद्यापपर्यंत राज्य सरकार व जिल्हा प्रशासनाकडून त्याला कोणतीही मदत मिळालेली नाही. कोरोनामुळे राज्यात सध्या सुरू असलेल्या आरोग्य सुरक्षा सप्ताहादरम्यान परिस्थिती आणखी बिकट झाली. कोरोना कालावधीत कोणताही खेळ व नृत्य कार्यक्रम नसल्यामुळे आर्थिक परिस्थिती ढासळली असून शेती करून तो कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
‘पुजारा खूप हळू खेळतो का?’, चाहत्याच्या प्रश्नावर ऑस्ट्रेलियन दिग्गजाचे मन जिंकणारे उत्तर
“एक काळ असा होता की, भारत आणि पाकिस्तान मालिकेला प्रतिष्ठेच्या ऍशेसपेक्षा जास्त पाठिंबा मिळायचा”
इशांत शर्मा होणार WTC Final मधून बाहेर? ‘या’ खेळाडूला मिळणार संधी