भारतीय चाहते माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी पुन्हा एकदा मैदानात उतरण्याची वाट पाहत आहेत. मात्र धोनी एका नव्या संकटात सापडला आहे. एमएस धोनीला झारखंड उच्च न्यायालयानं व्यावसायिक फसवणूक प्रकरणी नोटीस पाठवली आहे.
टीम इंडियाच्या या माजी विश्वविजेत्या कर्णधाराला न्यायालयीन प्रक्रियेत अडकावं लागू शकतं. धोनीचे जुने व्यावसायिक भागीदार मिहिर दिवाकर आणि सौम्या दास यांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर झारखंड उच्च न्यायालयानं माहीला हजर राहण्यासाठी समन्स पाठवले. हे प्रकरण धोनीची स्पोर्ट्स अकादमी कंपनी ‘अर्का स्पोर्ट्स अँड मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड’शी संबंधित आहे. यामध्ये मिहिर आणि सौम्या हे धोनीचे भागीदार होते.
वास्तविक, या कंपनीत मिहिर दिवाकर आणि सौम्या दास संचालकपदावर होते. मात्र या दोघांनी धोनीची फसवणूक केली. त्यानंतर जानेवारी 2024 मध्ये म्हणजेच या वर्षाच्या सुरुवातीला धोनीनं दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. या प्रकरणी मिहिर दिवाकर आणि सौम्या दास यांनी आता धोनी विरोधात काउंटर केस दाखल केली आहे. या संदर्भात झारखंड कोर्टानं धोनीला नोटीस पाठवली. या प्रकरणाच्या सुनावणीची तारीख अद्याप ठरलेली नाही.
मिहिर दिवाकर आणि सौम्या दास यांनी अर्का स्पोर्ट्स अँड मॅनेजमेंट कंपनीच्या वतीनं धोनीसोबत करार केला होता की, ते त्याच्या नावानं भारतात तसेच परदेशात क्रिकेट अकादमी सुरू करतील. यानंतर या वर्षी 5 जानेवारी रोजी धोनीनं रांचीमध्ये या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. यामध्ये धोनीच्या वतीनं सांगण्यात आलं होतं की, या दोन माजी संचालकांसोबतचा त्याचा करार 2021 मध्येच संपुष्टात आला होता. परंतु असं असतानाही हे दोघे त्याच्या नावावर क्रिकेट अकादमी उघडण्याचं काम सुरूच ठेवत होते. यामुळे धोनीनं सांगितलं की, त्याचं 15 कोटी रुपयांचं नुकसान झालं.
हेही वाचा –
न भूतो न भविष्यति! रोहित शर्माने आजच्याच दिवशी खेळली होती वनडे इतिहासातील सर्वोच्च खेळी!
वरुण चक्रवर्तीकडे अश्विनचा मोठा विक्रम मोडण्याची संधी, इतक्या विकेट्स घेऊन रचणार इतिहास
“तो चिडखोर स्वभावाचा…”, गौतम गंभीरच्या वक्तव्यावर रिकी पाँटिंगचा शाब्दिक हल्ला