भारत विरुद्ध न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये गुरुवारपासून (२५ नोव्हेंबर) कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर पहिल्या कसोटी सामन्याला प्रारंभ झाला आहे. टी२० मालिकेत ३-० ने पराभूत झाल्यानंतर न्यूझीलंड संघ जोरदार पुनरागमन करण्याच्या प्रयत्नात असणार आहे. तर भारतीय संघ ही अप्रतिम कामगिरी अशीच सुरू ठेवण्याच्या प्रयत्न करेल. पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय कर्णधार अजिंक्य रहाणेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. भारतीय संघाने टी२० मालिकेतील ३ सामन्यात आणि पहिल्या कसोटी सामन्यात नाणेफेक जिंकले आहे. अशातच न्यूझीलंडच्या अष्टपैलू खेळाडूने भारतीय संघाच्या नाणेफेक जिंकण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
नुकताच भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात झालेल्या टी२० मालिकेत जिमी नीशमने न्यूझीलंड संघाचे प्रतिनिधित्व केले होते. तो कसोटी क्रिकेटमध्ये संघाचे प्रतिनिधित्व करताना दिसून येत नाहीये. अशातच सोशल मीडियावर प्रचंड ॲक्टीव्ह असणाऱ्या जिमी नीशमने भारतीय संघाच्या सतत नाणेफेक जिंकण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.त्याने ट्विट करत, ‘कोणी नाणेफेकसाठी वापरण्यात येणारं नाण जवळून दाखवेल का.?’ त्याने असे ट्विट केले कारण, भारतीय संघाने आतापर्यंत एकही वेळेस नाणेफेक गमावले नाहीये.
सोशल मीडियावर देखील नाणेफेकीमुळे विराट कोहलीला ट्रोल केले जात आहे. विराट कोहली जेव्हा टी२० संघाचा कर्णधार होता,त्यावेळी भारतीय संघाने टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धेत नाणेफेकी गमावल्या होत्या. त्यापूर्वी इंग्लंड संघाविरुद्ध झालेल्या मालिकेत विराट कोहलीने नाणेफेक गमावले होते. ज्याचा परिणाम सामन्याच्या निकालावर पाहायला मिळाला होता. परंतु, रोहित शर्माने टी२० संघाचे कर्णधारपद स्वीकारल्यानंतर सलग ३ सामन्यात नाणेफेक जिंकले. तर पहिल्या कसोटी सामन्यात अजिंक्य रहाणेने देखील नाणेफेक जिंकले. विराट कोहलीच्या अनुपस्थितीत पहिला कसोटी सामन्यात भारतीय संघाचे कर्णधारपद अजिंक्य रहाणेच्या हाती देण्यात आले आहे. तर विराट कोहली मुंबईमध्ये होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यात पुनरागमन करणार आहे.
Can somebody take a closer look at those coins please? 🙄 #INDvNZ
— Jimmy Neesham (@JimmyNeesh) November 25, 2021
पहिल्या कसोटी सामन्यासाठी असे आहेत ११ जणांचे संघ –
भारत – शुबमन गिल, मयंक अगरवाल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (कर्णधार), श्रेयस अय्यर, वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, इशांत शर्मा, उमेश यादव
न्यूझीलंड – टॉम लॅथम, विल यंग, केन विलियम्सन (कर्णधार), रॉस टेलर, हेन्री निकोल्स, टॉम ब्लंडेल (यष्टीरक्षक), रचिन रवींद्र, टिम साउथी, एजाज पटेल, काइल जेमिसन, विल्यम सोमरविल