आयपीएल २०२६ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूची टीम दुसऱ्यांदा विजयाची हॅट्ट्रिक साधण्यापासून हुकली. दुसरीकडे, सलग दोन सामने गमावल्यानंतर दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने जोरदार पुनरागमन केले. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने २० षटकांत ८ गडी गमावून १७५ धावा केल्या. प्रत्युत्तरात दिल्ली कॅपिटल्सने शेवटच्या षटकात ६ गडी राखून हा सामना आपल्या नावावर केला.
टॉस हारल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या आरसीबीला चांगली सुरुवात मिळाली. विराट कोहली मात्र अवघ्या १९ धावाच करू शकला. दुसऱ्या बाजूला सलामीवीर फिल साल्टने ३८ चेंडूंत ६३ धावांची शानदार खेळी केली. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या देवदत्त पडिक्कलने १८ धावा केल्या, तर टिम डेव्हिडने २६ धावांचे योगदान दिले. मात्र, त्यानंतर मैदानात उतरलेल्या जितेश शर्माने २० चेंडूंत केवळ १४ धावा केल्या. इतकेच नाही तर त्याने कृणाल पांड्याला धावचीत (रन आऊट) देखील केले. याच कारणामुळे आरसीबीची टीम २० षटकांत ८ बाद १७५ धावांपर्यंतच मजल मारू शकली. दिल्ली कॅपिटल्ससाठी लुंगी एनगिडी, कुलदीप यादव आणि कर्णधार अक्षर पटेल यांनी प्रत्येकी २-२ बळी घेतले.
१७६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्सची सुरुवात अत्यंत खराब झाली. संघाने अवघ्या १८ धावांत ३ विकेट गमावल्या होत्या. मात्र, त्यानंतर सलामीवीर आणि यष्टीरक्षक केएल राहुलने ३४ चेंडूंत ५७ धावांची खेळी केली. त्याला साथ देताना ट्रिस्टन स्टब्सने ४७ चेंडूंत नाबाद ६० धावा फटकावल्या. कर्णधार अक्षर पटेलने ‘रिटायर्ड हर्ट’ होण्यापूर्वी २६ धावा केल्या, तर शेवटी डेव्हिड मिलरने १० चेंडूंत नाबाद २२ धावा करत आपल्या संघाला ६ गडी राखून विजय मिळवून दिला. आरसीबीकडून भुवनेश्वर कुमारने ३ विकेट घेत लढा दिला, पण त्याची ही मेहनत संघाला विजय मिळवून देण्यासाठी पुरेशी ठरली नाही.





