वेस्ट इंडिजविरुद्ध सुरू असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडचा दिग्गज फलंदाज जो रुट यानं शानदार धमाका केला. त्यानं शनिवारी एजबॅस्टन स्टेडियमवर वेस्ट इंडिजचा महान फलंदाज ब्रायन लाराचा विक्रम मोडला. रुट आता कसोटी इतिहासात सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत सातव्या स्थानावर पोहोचला आहे. त्यानं कसोटीमध्ये 12000 धावांचा पल्ला गाठला. लारानं आपल्या कारकिर्दीत 232 डावात 11953 धावा केल्या आहेत. तो आठव्या स्थानावर घसरला आहे. रुटनं दुसऱ्या कसोटीत वेस्ट इंडिजचा माजी क्रिकेटपटू शिवनारायण चंद्रपॉल (11867) याला मागे टाकलं होतं.
जो रुटनं डिसेंबर 2012 मध्ये कसोटी पदार्पण केलं. त्यानं आतापर्यंत 143 कसोटींमध्ये 32 शतकं आणि 63 अर्धशतके ठोकली आहेत. तिसऱ्या कसोटीत त्यानं अर्धशतक झळकावलं असून तो क्रीजवर उभा आहे. गेल्या सामन्यात त्यानं शतक झळकावलं होतं. टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. सचिननं 200 कसोटी सामन्यांमध्ये 15921 धावा केल्या आहेत. सचिनच्या नावे 51 शतकं आणि 68 अर्धशतकं आहेत.
या यादीत दुसऱ्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग आहे, ज्यानं 168 कसोटीत 13378 धावा केल्या आहेत. पाँटिंगनं 41 शतकं आणि 62 अर्धशतक साजरी केली आहेत. दक्षिण आफ्रिकेचा माजी अष्टपैलू खेळाडू जॅक कॅलिसनं 166 सामन्यांमध्ये 13289 धावा केल्या आहेत. त्याच्या नावे 45 शतकं आणि 58 अर्धशतकं आहेत. भारताचा माजी फलंदाज राहुल द्रविड चौथ्या स्थानावर आहे. द्रविडनं 164 कसोटीत 13288 धावा केल्या आहेत. तर इंग्लंडचा माजी खेळाडू ॲलिस्टर कुक (161 कसोटीत 12472 धावा) पाचव्या स्थानावर आहे.
इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज तिसऱ्या कसोटीबद्दल बोलायचं झालं तर, कॅरेबियन ब्रिगेडनं पहिल्या डावात 282 धावा केल्या. यजमान इंग्लंडची पहिल्या डावात सुरुवात चांगली झाली नाही. सलामीवीर बेन डकेटला केवळ 3 धावा करता आल्या. जॅक क्रॉलीनं 18 आणि ऑली पोपनं 10 धावा केल्या. मार्क वुडचं खातं उघडलं नाही. हॅरी ब्रूक (2) स्वस्तात पॅव्हेलियनमध्ये परतला. 12 व्या षटकापर्यंत 54 धावा जोडल्यानंतर इंग्लंडनं 5 विकेट गमावल्या होत्या. अशा स्थितीत रुटनं एक टोक घट्ट पकडून संघाला कठीण परिस्थितीतून बाहेर काढलं.
हेही वाचा –
“गंभीर भारतीय संघात फार काळ टिकणार नाही”, माजी भारतीय खेळाडूचा खळबळजनक दावा
हार्दिक-नताशाच्या नात्यात नवा ट्विस्ट! घटस्फोटानंतर ‘या’ गोष्टीवरुन सुरू झाला वाद?
“फक्त इंजिन बदललंय, डब्बे तेच आहेत”, ‘लीडर’ रोहितचं कर्णधार सूर्यकुमारकडून लै कौतुक