ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड (AUS vs ENG) यांच्यात ऍडलेड येथे ऍशेस मालिकेतील दुसरा कसोटी (2nd Test Of Ashes) सामना पार पडला. या सामन्याच्या पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाने ४७३ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात इंग्लंडचा संघ २३६ धावांवरच सर्वबाद झाला होता. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात २३७ धावांची आघाडी घेतली होती. त्यानंतर दुसऱ्या डावात २३० धावा करत इंग्लंडला ४६७ धावांचे अशक्यप्राय लक्ष्य दिले होते.
या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ १९२ धावांवरच गारद झाला. परिणामी त्यांना २७५ धावांनी पराभवाला (England Lost By 275 Runs) सामोरे जावे लागले आहे. या सामना पराभवासह इंग्लंडचा कर्णधार जो रूट (Joe Root) याच्या नावे एका नकोशा विक्रमाची नोंद झाली आहे.
ऍडलेडमधील दिवस रात्र कसोटी सामना गमावत रूट हा सर्वाधिक कसोटी सामन्यात पराभूत होणाऱ्या कर्णधारांच्या यादीत चौथ्या क्रमांकावर आला आहे. त्याने आतापर्यंत ५८ कसोटी सामन्यांमध्ये इंग्लंड संघाचे नेतृत्त्व केले आहे. त्यापैकी ऍडलेड कसोटीतील पराभव हा त्याच्या नेतृत्त्वाखालील इंग्लंड संघाचा २३ वा पराभव होता.
या सामन्यापूर्वी ब्रिसबेन येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यातही इंग्लंड संघाच्या हाती निराशा आली होती. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने इंग्लंडला ९ विकेट्सने पराभूत केले होते.
या नकोशा विक्रमाच्या यादीत दक्षिण आफ्रिकेचे माजी कर्णधार ग्रॅमी स्मिथ अव्वलस्थानी आहेत. त्यांनी त्यांच्या कसोटी कारकिर्दीतील १०९ सामन्यांमध्ये संघाचे नेतृत्त्व करताना २९ सामने गमावले होते. त्यांच्यानंतर स्टिफन फ्लेमिंग २७ सामन्यांसह दुसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यांनी ८० कसोटी सामन्यांमध्ये संघाचे कर्णधारपद सांभाळले होते. तर या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहेत ब्रायन लारा, ज्यांच्या कर्णधारपदाखाली वेस्ट इंडीजने २६ सामन्यांमध्ये पराभवाचे तोंड पाहिले होते.
सर्वाधिक कसोटी सामने गमावणारे कर्णधार (Most Test Lost As Captains)-
२९ (१०९) ग्रॅमी स्मिथ
२७ (८०) स्टिफन फ्लेमिंग
२६ (४७) ब्रायन लारा
२३ (५८) जो रूट*
२२ (५९) ऍलिस्टर कूक
२२ (९३) ऍलेन बॉर्डर
२१ (३७) जेसन होल्डर
२१ (५४) मिचेल अथर्टन
महत्त्वाच्या बातम्या-
धक्कादायक! राफेल नदाल झाला कोरोनाबाधित; पुनरागमनाची प्रतिक्षा लांबली
टीम इंडियासाठी २०२१ मध्ये २५ खेळाडूंचे पदार्पण; ‘हा’ डाव्या हाताचा गोलंदाज राहिला चर्चेत
विजय हजारे ट्रॉफी: ‘या’ ८ संघांनी मिळवली क्वार्टर फायनलमध्ये जागा, पाहा कसे आहे बाद फेरीचे वेळापत्रक