नवी दिल्ली | आयपीएलच्या 13 व्या हंगामातील 30 वा सामना बुधवारी(14 ऑक्टोबर) दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात झाला. नाणेफेक जिंकल्यानंतर दिल्लीने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. सलामीवीर पृथ्वी शॉ आणि शिखर धवन दिल्लीकडून सलामीला फलंदाजीसाठी मैदानात आले. पण राजस्थानचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरने डावाच्या पहिल्याच चेंडूवर शॉला त्रिफळाचित केले. एवढेच नाही त्यानंतर आर्चरने आसामचे स्थानिक ‘बिहू’ नृत्यही केले.
वास्तविक पाहता दिल्लीविरुद्धच्या सामन्याआधी राजस्थानने सनरायझर्स हैदराबादचा 5 गडी राखून पराभव केला होता; त्यावेळी ‘आसामची शान’ म्हणून ओळखल्या जाणार्या राजस्थानच्या रियान परागने षटकार खेचून संघाला विजय मिळवून दिला. त्यानंतर त्यानेही बिहू नृत्य केले केले होते. परागने हैदराबादविरुद्ध 26 चेंडूत नाबाद 42 धावा केल्या होत्या. त्यावेळी परागच्या बिहू नृत्याची बरीच चर्चा झाली होती.
त्यानंतर आता बुधवारी शॉला तंबूत पाठवल्यावर आर्चरनेही त्याच प्रकारचे नृत्य केले. त्याने परागसोबतही हे नृत्य करून आनंद साजरा केला. विशेष म्हणजे हा सामना सुरु होण्याआधीसुद्धा आर्चर रियानबरोबर मस्ती करताना दिसला होता. तेव्हाही त्याने बिहू नृत्य केले होते.
Is the Bihu dance catching up in the @rajasthanroyals squad? 😅😅#Dream11IPL pic.twitter.com/40D9l9mhwC
— IndianPremierLeague (@IPL) October 14, 2020
या सामन्यात आर्चरने जबरदस्त गोलंदाजी केली. पहिल्याच चेंडूवर शॉला बाद केल्यानंतर डावाच्या तिसऱ्या षटकात त्याने अनुभवी अजिंक्य राहणेला बाद केले. मात्र त्यानंतरही दिल्लीने प्रथम फलंदाजी करताना सलामीवीर शिखर धवन(57) आणि कर्णधार श्रेयस अय्यर(53) यांच्या अर्धशतकांच्या मदतीने दिल्लीने 20 षटकांत 7 बाद 167 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल राजस्थानला 20 षटकांत केवळ 148 धावा करता आल्या. त्यामुळे राजस्थानला 13 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला.
लीगमध्ये दोन्ही संघ दुसऱ्यांदा आमनेसामने आले होते. मागील सामन्यात श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील दिल्लीने राजस्थानचा 46 धावांनी पराभव केला होता.
या सामन्यात विजय मिळवून दिल्लीने गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे. गुणतालिकेत राजस्थान संघ सातव्या स्थानावर आहे.