अवघ्या काही दिवसात टी२० विश्वचषकाचे बिगुल वाजणार आहे. सर्व संघ आपआपल्या परीने मैदानात उतरण्यास सज्ज झाले आहेत. क्रिकेट रसिकांसोबतच आजी-माजी खेळाडू देखील आपल्या संघांना पाठिंबा दर्शवण्यासाठी प्रयत्न करतायेत. यात इंग्लंडचा जोफ्रा आर्चर देखील मागे नाही. स्वतः जोफ्रा आर्चर आणि अष्टपैलू बेन स्टोक्स संघात नसतानाही संयुक्त अरब अमिरातीमध्ये होणाऱ्या आगामी टी२० विश्वचषकात इंग्लंडच्या विजयाबद्दल तो आत्मविश्वास बाळगून आहे. आर्चरचा असा विश्वास आहे की, जेव्हा कोणताही संघ विश्वचषकात इंग्लंड संघासमोर खेळायला येईल, तेव्हा त्यांना भीती वाटली पाहिजे.
दुखापतग्रस्त आहे आर्चर
आर्चरच्या उजव्या हाताच्या कोपऱ्याला फ्रॅक्चर झाल्यामुळे या विश्वचषक स्पर्धेला तो मुकला आहे. तर, स्टोक्स त्याच्या मानसिक आरोग्यावर लक्ष केंद्रित करत असल्याने त्याला संघात स्थान देण्यात आले नाही. आर्चर बराच काळ मैदानावर उतरलेला नाही आणि त्याची दुखापत ही इंग्लड संघासाठी मोठी समस्या आहे.
इतर संघ आम्हाला घाबरतील
एका स्तंभात आर्चर म्हणाला की, ‘होय, मी आणि बेन स्टोक्स उपलब्ध नाही. पण, संघ कसा खेळेल याची मला अजिबात चिंता नाही. मला माहित आहे की आमच्या अनुपस्थितीतही संघात चांगले पर्यायी खेळाडू आहे. आम्ही बऱ्याच काळापासून यशस्वी होत आलो आहोत. आम्ही क्रमवारीत अव्वल आहोत आणि आमचे खेळाडू सामन्यावर वर्चस्व ठेवून असतात. म्हणून पुढील काही आठवड्यांत जेव्हा इतर संघ आमच्या संघासमोर येतील, तेव्हा ते आम्हाला घाबरून असतील.’
महत्त्वाची बाब म्हणजे, इंग्लंडचा संघ गेल्या विश्वचषकात अंतिम फेरी गाठण्यात यशस्वी झाला होता. २०१६ च्या टी२० विश्वचषकात वेस्ट इंडिज संघाने त्यांना पराभूत केले होते. ही स्पर्धा भारतात झाली होती. या वेळी देखील ही स्पर्धा भारतातच होणार होती. पण, कोरोना विषाणूच्या जागतिक महामारीमुळे ती यूएईमध्ये आयोजित केली जात आहे. मात्र, येथेही भारतच यजमान आहे. यावेळी इंग्लंड संघाचा खेळ कसा असेल हे पाहावे लागेल.
इंग्लडचा संघ-
ओएन मॉर्गन (कर्णधार), मोईन अली, जॉनी बेअरस्टो, सॅम बिलिंग्स, जोस बटलर, सॅम करन, ख्रिस जॉर्डन, लियाम लिव्हिंगस्टोन, डेविड मलान, टायमल मिल्स, आदिल रशीद, जेसन रॉय, डेव्हिड विली, ख्रिस वोक्स, मार्क वुड. ट्रॅव्हलिंग रिझर्व्ह : टॉम करन, लियाम डॉसन आणि जेम्स व्हिन्स.