आगामी 2 जूनपासून 2 कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी इंग्लंड संघ न्यूझीलंडचे यजमानपद भूषवणार आहे. या मालिकेसाठी मंगळवारी इंग्लंडच्या संघाची घोषणा होणे अपेक्षित आहे. मात्र, त्याआधीच इंग्लंडसमोर एक मोठा अडथळा निर्माण झाला आहे. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरची न्यूझीलंडविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेत खेळण्याची शक्यता आणखीनच कमी झाली आहे.
आर्चरच्या दुखापतीने केन्ट विरुद्ध ससेक्सच्या काउंटी चॅम्पियनशिपमधील सामन्यादरम्यान पुन्हा डोके वर काढले आहे. आर्चरच्या कोपराला दुखापत झाली आहे. आर्चर यापूर्वीही याच दुखापतीमुळे भारताविरुद्धच्या वनडे मालिकेला मुकला होता. त्यानंतर त्याला आयपीएल मधून देखील माघार घ्यावी लागली होती.
ससेक्सकडून दुखापतीनंतर आपला पहिला स्पर्धात्मक सामना खेळणार्या आर्चरने पहिल्या डावात 29 धावा देत 2 बळी टिपले. मात्र तो दुसऱ्या डावात दुखापतीमुळे केवळ 5 षटकेच गोलंदाजी करू शकला.
ससेक्सचे मुख्य प्रशिक्षक इयान सॅलिसबरी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, जर तुम्ही आजच्या दिवसाची माहिती घेतली तर तो( आर्चर) उद्या गोलंदाजी करू शकणार नाही. आम्हाला इंग्लंड क्रिकेट बोर्डाशी चर्चा करावी लागेल. ते पुढे म्हणाले की, जेव्हा जेव्हा आर्चर गोलंदाजी करण्यास असमर्थ असतो, तेव्हा कर्णधार आणि संघ म्हणून ते तुमच्यासाठी वाईट असते.पण क्रिकेट मध्ये अशा घटना घडत असतात.
सॅलिसबरीने सांगितले की आर्चर अजूनही मैदानात उतरण्यास उत्सुक आहे, कारण त्याला ससेक्सला सामना जिंकवायचा आहे. या सामन्यात खेळण्यासाठी त्याला ईसीबीने मान्यता द्यायला हवी. तो आमचा खेळाडू नाही, त्यामुळे आम्हाला त्यांच्याकडूनच (ईसीबी) मान्यता घ्यावी लागेल.
न्यूझीलंडविरूद्धच्या मालिकेनंतर इंग्लंडला आपल्या मायभूमीतच भारताविरुद्ध बहुप्रतिक्षित 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. भारताविरुद्धच्या मालिकेला 4 ऑगस्ट पासून सुरुवात होणार आहे. आर्चर हा इंग्लड संघाचा प्रमुख गोलंदाज असल्यामुळे, हे बघणे उत्सुकतेचे ठरेल की त्याची ही दुखापत किती कालावधीत पूर्णता बरी होते.
महत्त्वाच्या बातम्या –
या ५ खेळाडूंना मानले जाते सर्वाधिक आळशी क्रिकेटपटू; २ भारतीयांचाही समावेश
कौंटी क्रिकेटमध्ये ‘या’ गोलंदाजांची शानदार कामगिरी, एकाच डावात घेतल्या ९ विकेट्स
नाचा रे! शुबमन गिल अन् कमलेश नागरकोटीसह थिरकले राणा दाम्पत्य, एकदा पाहाच हा डान्स व्हिडिओ






