वर्ल्ड रेसलिंग एंटरटेनमेंट (WWE) चा दिग्गज कुस्तीपटू ‘जॉन सीना’ लवकरच आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीचा अंत करणार आहे. जॉन सीनानं WWE च्या सोशल मीडिया अकाउंट्सवर पोस्ट केलेल्या व्हिडिओद्वारे इन-रिंग स्पर्धेतून निवृत्तीची घोषणा केली. तो 2025 मध्ये WWE चा निरोप घेईल.
जॉन सीनानं अचानक निवृत्तीची घोषणा करून जगभरातील चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. कॅनडातील शो दरम्यान जॉन सिना म्हणाला, “आज रात्री मी WWE मधून माझ्या निवृत्तीची अधिकृत घोषणा करत आहे.” जॉन सीनच्या या घोषणेनं त्याचे चाहते दु:खी झाले आहेत. एका सोशल मीडिया यूजरनं ‘विल मिस यू चॅम्पियन’ अशी कमेंट केली. तर आणखी एका चाहत्यानं, “जॉन सीनाशिवाय WWE पाहणे कठीण होईल”, असं म्हटलंय.
जॉन सीनानं 2002 मध्ये WWE मध्ये पदार्पण केलं होतं. त्यानं 20 वर्षांहून अधिक काळ रिंगमधून चाहत्यांचं मनोरंजन केलं. जॉन सीना विरुद्ध द रॉक आणि ट्रिपल एच विरुद्ध रँडी ऑर्टन यांसारख्या जबरदस्त झुंजी चाहत्यांमध्ये खूप लोकप्रिय आहेत. जॉन सीनानं 13 वेळा WWE चॅम्पियनशिप आणि 3 वेळा वर्ल्ड हेवीवेट चॅम्पियनशिपचं विजेतेपद जिंकलंय. WWE मध्ये सर्वाधिक विजेतेपदं जिंकण्याच्या बाबतीत तो महान कुस्तीपटू रिक फ्लेअरच्या बरोबरीत आहे.
47 वर्षीय जॉन सीनानं स्पष्ट केलं की, 2025 हे त्याचं व्यावसायिक कुस्तीतील शेवटचं वर्ष असेल. तो वर्षाच्या पहिल्या रॉ एपिसोडमध्ये दिसणार आहे, जे प्रथमच नेटफ्लिक्सवर प्रसारित होणार आहे. जॉन सीना पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये रॉयल रंबल, मार्चमध्ये एलिमिनेशन चेंबर आणि लास वेगासमध्ये शेवटचा WWE रेसलमेनिया सामना खेळणार आहे.
जॉन सीना सध्या 47 वर्षांचा आहे. त्याला WWE मध्ये परफॉर्म करण्यासोबतच त्याच्या चित्रपटांतील करिअरवर लक्ष केंद्रित करणं खूप कठीण जात होतं. या कारणामुळे त्यानं WWE रिंगला अलविदा करण्याचा निर्णय घेतला. जॉन सीना अलीकडे फास्ट अँड फ्युरियस, बार्बी यांसारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये दिसला आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
मराठी पाऊल पडते पुढे! महाराष्ट्राच्या धावपटूनं रचला नवा राष्ट्रीय विक्रम, स्वत:चाच रेकॉर्ड मोडला
लॉर्ड्सवर शर्ट फिरवून दाखवली होती ‘दादागिरी’! कांगारुंना पुरुन उरणाऱ्या गांगुलीची कहानी
अभिषेक शर्मानं शुबमन गिलची बॅट उधार घेऊन ठोकलं शतक, काय आहे कारण?