श्रीलंका व इंग्लंड संघादरम्यान गॉले येथे नुकत्याच पार पडलेल्या कसोटी सामन्यात इंग्लंडने यजमान श्रीलंकेचा 7 गडी राखून पराभव केला आहे. सामन्याच्या पाचव्या दिवशी इंग्लंडने माफक 74 धावांचे लक्ष पूर्ण केले.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या श्रीलंकेचा संघ पहिल्या डावात १३५ धावांवर सर्वबाद झाला होता. त्यांच्याकडून कर्णधार दिनेश चंडिमलने सर्वाधिक 28 धावा केल्या होत्या. इंग्लंडकडून डॉमिनिक बेसने 30 धावा देत 5 बळी मिळवले होते. प्रत्युत्तरात इंग्लंडने आपल्या पहिल्या डावात 421 धावांचा मोठा डोंगर उभा केला. इंग्लंडकडून कर्णधार जो रुटने शानदार 228 धावांची खेळी केली.
श्रीलंकेने आपल्या दुसऱ्या डावात काहीसा संघर्ष दाखवला व 359 धावांपर्यंत मजल मारली. श्रीलंकेकडून दुसऱ्या डावात लाहिरू थिरीमानेने 111 धावांची खेळी केली. मात्र पहिल्या डावात 286 धावांची पिछाडी स्विकारावी लागल्याने त्यांना इंग्लंडला केवळ 74 धावांचे आव्हान देता आले. इंग्लंडने आपल्या दुसऱ्या डावात झटपट तीन गडी गमावल्यानंतर श्रीलंकेला आशेचा किरण दिसला होता, मात्र इंग्लंडने सामन्याच्या पाचव्या दिवशी 74 धावांचे लक्ष्य 3 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केले.
श्रीलंकेकडून दुसऱ्या डावात केवळ लसिथ एम्बुलडेनियालाच विकेट्स घेता आल्या. त्याने जॅक क्रॉली आणि डॉमनिक सिब्ले या दोन्ही सलामीवीरांना अनुक्रमे 8आणि 2 धावांवर बाद केले.
इंग्लंडच्या ऐतिहासिक विजयाचा नायक ठरला तो कर्णधार जो रूट. रूटने 321 चेंडूंचा सामना करत 228 धावांची शानदार खेळी केली. रुटला आपल्या शानदार फलंदाजीमुळे सामनावीराचा पुरस्कार देखील घोषित करण्यात आलेला आहे. दोन सामन्यांच्या मालिकेतील दुसरा कसोटी सामना 22 जानेवारी रोजी गॉले येथेच पार पडणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
ब्रिस्बेन कसोटीत अंपायरचा शार्दुलवर अन्याय? तळातील फलंदाजाला वेगवान बाउंसर टाकल्याने दिली चेतावणी
ऑस्ट्रेलियात एका कसोटी सामन्यात ७ हून अधिक विकेट्स अन् अर्धशतक, फक्त ‘यांनी’ केलाय हा रेकॉर्ड
पहिल्या फाइव्ह विकेट हॉलनंतर ‘असे’ केले भारतीय खेळाडूंनी मोहम्मद सिराजचे स्वागत, पाहा व्हिडिओ