टी20 विश्वचषक 2024 चा 49 वा सामना रविवारी (23 जून) अमेरिका आणि इंग्लंड यांच्यात खेळला गेला. सुपर 8 फेरीच्या या सामन्याचं महत्त्व उपांत्य फेरीच्या दृष्टीनं खूप जास्त होतं. या सामन्यात विजय मिळवून इंग्लंड सेमीफायनलमध्ये पोहचणारा पहिला संघ बनला आहे.
इंग्लिश संघाला 10 गडी राखून दणदणीत विजय मिळवून देण्यात कर्णधार जोस बटलरनं महत्त्वाची भूमिका बजावली. त्यानं 116 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना तुफानी खेळी खेळली आणि 10व्या षटकातच आपल्या संघाला विजय मिळवून दिला. बटलरनं 38 चेंडूत 6 चौकार आणि 7 जबरदस्त षटकारांसह नाबाद 83 धावा केल्या. आपल्या डावात षटकारांचा पाऊस पाडणाऱ्या इंग्लिश कर्णधारानं दिग्गज युवराज सिंगच्या खास क्लबमध्ये स्थान मिळवलं आहे.
आपल्या नाबाद खेळीदरम्यान जोस बटलरनं नवव्या षटकात अतिशय आक्रमक फलंदाजी करत हरमीत सिंगविरुद्ध सलग 5 षटकार ठोकले. अशाप्रकारे टी20 विश्वचषकात एका षटकात 5 किंवा त्याहून अधिक षटकार मारणारा तो दुसरा फलंदाज बनला आहे. त्याच्या आधी हा पराक्रम भारताचा माजी खेळाडू युवराज सिंग यानं केला होता. युवराजनं 2007 च्या टी20 विश्वचषकात इंग्लंडच्या स्टुअर्ट ब्रॉडविरुद्ध एका षटकात 6 षटकार मारण्याचा विक्रम केला होता.
फिल सॉल्टनं नवव्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर 1 धाव घेत जोस बटलरला स्ट्राइक दिली. यानंतर बटलरनं सलग चार षटकार मारले. त्यानंतर शेवटचा चेंडू वाईड झाला. हरमीतनं पुन्हा चेंडू टाकला तेव्हा बटलरनं हा चेंडू देखील सीमारेषेच्या बाहेर मारला. अशाप्रकारे जोस बटलरनं एका ओव्हरमध्ये सलग पाच षटकार मारले.
बटलरनं पहिला षटकार लाँग ऑनवर मारला. दुसरा षटकार मिड-विकेटच्या दिशेनं, तिसरा समोरच्या दिशेनं, चौथा डीप स्क्वेअर लेगच्या दिशेनं आणि पाचवा षटकार पुन्हा लाँग ऑनच्या क्षेत्रात मारला. जोस बटलरच्या या झंझावाती खेळीच्या जोरावर इंग्लंडनं अमेरिकेचा सहज पराभव करत उपांत्य फेरीत आपलं स्थान निश्चित केलं.
महत्त्वाच्या बातम्या –
“अफगाणिस्तान भारताविरुद्ध जाणूनबुजून हरला”, पाकिस्तानी पत्रकाराचे बिनबुडाचे आरोप; आर अश्विनचं प्रत्युत्तर
जोस बटलरचं विस्फोटक अर्धशतक! इंग्लंडचा 10 गडी राखून शानदार विजय!
शाकिब अल हसननं रचला इतिहास! टी20 वर्ल्डकपमध्ये अशी कामगिरी करणारा पहिला खेळाडू