आयसीसी टी-२० विश्वचषक २०२१ स्पर्धेतील २६ वा सामना इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या सामन्यात इंग्लंड संघाने ८ गडी राखून विजय मिळवला. यासह इंग्लंडने विजयाची हॅटट्रिक देखील केली आहे. या सामन्यात १२६ धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या इंग्लंड संघाकडून जोस बटलर आणि जॉनी बेअरस्टो या दोन्ही फलंदाजांनी ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू ॲडम झम्पाच्या एकाच षटकात षटकारांचा पाऊस पाडला, ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतोय.
इंग्लंड संघाची फलंदाजी सुरू असताना, ऑस्ट्रेलिया संघाकडून ११ वे षटक टाकण्याची जबाबदारी ॲडम झम्पाला देण्यात आली होती. या षटकात इंग्लंडच्या दोन्ही फलंदाजांनी २० धावा फटकावल्या. या षटकात जोस बटलरने एक आणि जॉनी बेअरस्टोने २ गगनचुंबी षटकार मारत इंग्लंड संघाला विजय मिळवून दिला.
या षटकातील पहिल्या चेंडूवर जोस बटलरने स्टेप आऊट होऊन समोरच्या दिशेने षटकार मारला. त्यानंतर षटकातील तिसऱ्या चेंडूवर जॉनी बेअरस्टोने लाँग ऑनच्या वरून गगनचुंबी षटकार मारला. तसेच पुढील चेंडूवर त्याने मिड विकेटच्या वरून आणखी एक कडक षटकार मारला. त्यांनी मिळून झम्पाची केलेली अवस्था पाहून इंग्लंडचा कर्णधार ओएन मॉर्गनला देखील त्याची दया आल्यासारखे दिसत होते. आयसीसीने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केलेला व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
https://www.instagram.com/reel/CVqQI7Tl8o4/?utm_medium=copy_link
इंग्लंड संघाने ८ गडी आणि ५० चेंडू शिल्लक ठेऊन मिळवला विजय
या सामन्यात इंग्लंड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. तर ऑस्ट्रेलिया संघाकडून प्रथम फलंदाजी करताना, कर्णधार आरोन फिंचने सर्वाधिक ४४ धावांची खेळी केली. तर ॲस्टोन एगरने २० आणि मॅथ्यू वेडने १८ धावांचे योगदान दिले. या खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलिया संघाला २० षटक अखेर १२५ धावा करण्यात यश आले होते. या धावांचा पाठलाग करताना इंग्लंड संघाकडून जोस बटलरने सर्वाधिक ७१ तर जेसन रॉयने २२ आणि जॉनी बेअरस्टोने नाबाद १६ धावांची खेळी करत इंग्लंड संघाला हा सामना ८ गडी राखून जिंकून दिला.
महत्त्वाच्या बातम्या-
न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यासाठी टीम इंडियाने कसली कंबर, पाहा काही खास क्षणचित्रे
मागच्या बाजूने धावत जात वोक्सचा भन्नाट एकहाती झेल; व्हिडिओ पाहून कौतुकाने वाजवाल टाळ्या






