इंडियन प्रीमिअर लीग २०२२मधील सर्वात महत्त्वाचा अंतिम सामना गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स संघात पार पडला. हा सामना रविवारी (दि. २९ मे) नरेंद्र मोदी स्टेडिअम, अहमदाबाद येथे खेळला गेला. या सामन्यात जोस बटलर याने जबरदस्त फटकेबाजी करत एका खास विक्रमाला गवसणी घातली.
या सामन्यात राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) संघाने नाणेफेक जिंकत फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यावेळी राजस्थानकडून डावाची सुरुवात करताना जोस बटलर (Jos Buttler) याने ३५ चेंडूत ३९ धावा केल्या. या धावा करताना त्याने ५ चौकारही मारले. यादरम्यान त्याला मागील काही सामन्यांप्रमाणे मोठी धावसंख्या उभारता आली नाही. मात्र, त्याने जितक्या धावा केल्या, त्यामध्ये त्याने मोठा विक्रम रचला.
बटलर बनला आयपीएलच्या एका हंगामात सर्वाधिक धावा करणारा दुसरा फलंदाज
बटलर याने ३९ धावा करत आयपीएलच्या एका हंगामात सर्वाधिक धावा करणारा दुसरा फलंदाज ठरला. त्याने आयपीएल २०२२च्या हंगामात १७ सामने खेळताना ५७.५२च्या सरासरीने ८६३ धावा चोपल्या आहेत. या धावा करताना त्याने ४ शतके आणि ४ अर्धशतकेही झळकावली आहेत. बटलरने या धावा करत डेविड वॉर्नर याचा विक्रम मोडला. वॉर्नर याने आयपीएल २०१६मध्ये १७ सामने खेळताना ६०.५७च्या सरासरीने ८४८ धावा चोपल्या होत्या.
आयपीएलच्या एका हंगामात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये अव्वलस्थानी विराट कोहली (Virat Kohli) आहे. विराटने आयपीएल २०१६मध्ये १६ सामने खेळताना ८१.०८च्या सरासरीने ९७३ धावा चोपल्या होत्या. या धावा करताना त्याने ४ शतके आणि ७ अर्धशतकेही झळकावली होती. या यादीत चौथ्या स्थानी केन विलियम्सन आहे. त्याने आयपीएल २०१८मध्ये ७३५ धावा केल्या होत्या. त्यानंतर ख्रिस गेल आणि मायकल हसी संयुक्तरीत्या पाचव्या स्थानी आहेत. गेलने आयपीएल २०१२मध्ये ७३३ आणि हसीने आयपीएल २०१३मध्ये ७३३ धावा केल्या होत्या.
एका हंगामात सर्वाधिक धावा करणारे फलंदाज
९७३ धावा- विराट कोहली (२०१६)
८५७ धावा- जोस बटलर (२०२२)*
८४८ धावा- डेविड वॉर्नर (२०१६)
७३५ धावा- केन विलियम्सन (२०१८)
७३३ धावा- ख्रिस गेल (२०१२)
७३३ धावा- मायकल हसी (२०१३)
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
कानामागून आला आणि तिखट झाला; एकच चेंडू फेकला आणि उमरान मलिकचं बक्षीस घेऊन गेला