सातव्या टी२० विश्वचषकाचा अंतिम सामना दुबई येथील दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या संघांदरम्यान खेळला गेला. ऑस्ट्रेलियन संघाने उत्कृष्ट सांघिक कामगिरी करत आपले पहिलेवहिले टी२० विश्वविजेतेपद पटकावले. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम गोलंदाजी करताना न्यूझीलंडचा डाव १७२ धावांवर रोखला होता. ऑस्ट्रेलियासाठी प्रमुख वेगवान गोलंदाज जोस हेजलवूडने तीन गडी बाद करत सर्वोत्कृष्ट कामगिरी केली. याचबरोबर त्याने टी२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यातील एका विक्रमाची बरोबरी केली.
हेजलवूडने केली त्या विक्रमाची बरोबरी
ऑस्ट्रेलियाचा प्रमुख वेगवान गोलंदाज असलेल्या जोस हेजलवूडने इतर गोलंदाज अंतिम सामन्यात महागडे ठरत असताना अत्यंत किफायतशीर गोलंदाजी करत डेरिल मिशेल, केन विलियम्सन व ग्लेन फिलीप्स यांना बाद केले. त्याने आपल्या चार षटकांत केवळ १६ धावा दिल्या.
हेजलवूडने या कामगिरीसह २००७ टी२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात इरफान पठाणने पाकिस्तान विरुद्ध अशीच कामगिरी केली होती. त्याने या सामन्यात १६ धावा खर्च करताना तीन फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला होता. टी२० विश्वचषक अंतिम फेरीतील ही सर्वोत्कृष्ट गोलंदाजी कामगिरी आहे.
असा रंगला अंतिम सामना
नाणेफेक गमावल्याने फलंदाजीचे आमंत्रण मिळाल्यानंतर न्यूझीलंड संघाने आपला पहिला बळी लवकर गमावला. त्यानंतर, मार्टिन गप्टिल याने २४ धावांचे योगदान दिले. कर्णधार केन विलियम्सनने ८५ धावांची लाजवाब खेळी करत संघाला १७२ पर्यंत मजल मारून दिली. ऑस्ट्रेलियासाठी जोश हेजलवूडने तीन बळी आपल्या नावे केले.
न्यूझीलंडने दिलेले १७३ धावांचे आव्हान पार करताना ऑस्ट्रेलियाला १५ धावांवर कर्णधार ऍरॉन फिंचच्या रूपाने पहिला धक्का बसला. मात्र, त्यानंतर डेव्हिड वॉर्नर व मिचेल मार्श यांनी ९२ धावांची शानदार भागीदारी करत सामना ऑस्ट्रेलियाच्या बाजूने झुकवला. दोघांनीही आपली अर्धशतके पूर्ण केली. वॉर्नर बाद झाल्यानंतर मार्शने अखेरपर्यंत किल्ला लढवत संघाला विजेतेपद मिळवून दिले.