टीम इंडियाचे माजी मुख्य प्रशिक्षक आणि प्रसिद्ध समालोचक रवी शास्त्री तसेच इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉन यांनी ऑस्ट्रेलियन संघात एकजुटीचा अभाव असल्याचं म्हटलं आहे. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचा पहिला सामना हरल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जोश हेझलवूडनं ज्या प्रकारचं विधान केलं, त्यामुळे ऑस्ट्रेलियन संघाच्या एकतेवर प्रश्न उपस्थित होत आहेत. पर्थ कसोटीतील पराभवासाठी जोश हेझलवूडनं फलंदाजांना जबाबदार धरलं. भारतानं हा सामना 295 धावांच्या फरकानं जिंकला. या सामन्यात ऑस्ट्रेलियन संघ पहिल्या डावात 104 धावा करून गडगडला.
जोश हेझलवूड पत्रकार परिषदेत म्हणाला, “कदाचित तुम्हाला हा प्रश्न एखाद्या फलंदाजाला विचारावा लागेल, मी थोडी विश्रांती घेण्याचा प्रयत्न करत आहे. मी पुढील कसोटीवर लक्ष केंद्रित करत आहे.” यावर नुकताच निवृत्त झालेला दिग्गज डेव्हिड वॉर्नर म्हणाला, “माझ्या मते एक वरिष्ठ खेळाडू म्हणून जेव्हा तुम्ही संघाचं प्रतिनिधित्व करत असता तेव्हा फलंदाजांसाठी काहीतरी करणं हे तुमचे कर्तव्य आहे. ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी जास्त धावा केल्या नाहीत, पण त्यांना वरिष्ठ गोलंदाजाचा पाठिंबा मिळायला हवा.”
मायकेल वॉननं देखील संघाच्या ड्रेसिंग रूममधील संभाव्य विभाजनावर शंका उपस्थित केली. तो म्हणाला की, त्यानं कोणत्याही ऑस्ट्रेलियनकडून असं कधीही ऐकलं नाही. फॉक्स क्रिकेटवर वॉन म्हणाला, “सार्वजनिकपणे मी कधीही ऑस्ट्रेलियन खेळाडूला फलंदाज आणि गोलंदाजांमध्ये विभागणी करताना पाहिलेलं नाही. प्रत्येक खेळाडूला फलंदाजी करावीच लागते. मी नेहमी प्रत्येक संघातील छोट्या-छोट्या गोष्टींकडे लक्ष ठेवून असतो. ऑस्ट्रेलियाच्या संघात आऊटफिल्डमध्ये एकजुटीचा आणि उत्साहाचा अभाव दिसून येत आहे.
पर्थ कसोटीत ऑस्ट्रेलियाचा दारुण पराभव झाला. पहिल्या डावात भारतीय संघ 150 धावांवर ऑलआऊट झाल्यानंतर ऑस्ट्रेलियन फलंदाजी 104 धावांवरच गडगडली होती. त्यामुळे कांगारु फलंदाजांवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.
हेही वाचा –
दिल्लीसोबतचं नातं संपल्यानंतर रिषभ पंतची भावनिक पोस्ट, चाहत्यांना उद्देशून म्हणाला…
लिलावात करोडपती झालेल्या 13 वर्षीय खेळाडूवर वयाच्या फसवणुकीचा आरोप
कोच गंभीर ऑस्ट्रेलिया दौरा अर्ध्यात सोडून मायदेशी परतला! कारण जाणून घ्या