चार वर्षांपूर्वीच्या एका गंभीर प्रकरणात अडकलेला ऑस्ट्रेलिया कसोटी संघाचा माजी कर्णधार टीम पेनने कर्णधारपद सोडल्यानंतर ऍशेस मालिकेतून आपले नाव मागे घेतले होते. त्याच्या जागी पॅट कमिन्सची ऑस्ट्रेलिया कसोटी संघाचा नवा कर्णधार म्हणून निवड करण्यात आली आहे. आता या मालिकेसाठी पेनच्या जागी जॉस इंग्लिसचे नाव समोर येत आहे. इंग्लिसने सुमारे ४ वर्षांपूर्वी इंग्लंड क्रिकेट संघाला आपले समर्थन दिले होते. मात्र, आता इंग्लंडला हरवण्यासाठी त्याची ऑस्ट्रेलिया संघात निवड होऊ शकते.
यॉर्कशायरचा माजी क्रिकेटपटू आणि यष्टिरक्षक फलंदाज इंग्लिसचे कुटुंब २०१० मध्ये वेस्टर्न ऑस्ट्रेलियामध्ये स्थलांतरित झाले. एका संभाषणात चार वर्षांपूर्वी तो म्हणाला की, मी अजूनही इंग्लंडला आपले समर्थन देत असतो. आता पेनच्या जागी या इंग्लंड समर्थकाचा ऑस्ट्रेलिया संघात समावेश केला जाऊ शकतो. त्याला आपल्या आवडत्या संघाला आणि इंग्लंडला पराभूत करण्यासाठी मैदानात उतरावे लागू शकते.
ऑस्ट्रेलियाच्या निवडकर्त्यांनी अधिकृतपणे पॅट कमिन्सला नवा कर्णधार म्हणून दुजोरा दिला आहे. तब्बल ६४ वर्षांनंतर एका वेगवान गोलंदाजाची ऑस्ट्रेलिया संघाचा कसोटी कर्णधारपदी निवड झाल्याची घटना घडली. त्याचबरोबर माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथची उपकर्णधारपदी निवड करण्यात आली आहे.
अलीकडे, जॉस इंग्लिस परदेशी खेळाडू म्हणून लीसेस्टरशायर आणि लंडन स्पिरिट संघाशी जोडला गेला होता. याआधी तो १४ वर्षाखालील स्तरावरील क्रिकेटमध्ये यॉर्कशायरकडून खेळला होता. २०१७ मध्ये एका मुलाखतीदरम्यान त्याने सांगितले होते की, जर आपण ज्या देशात जन्माला आलो आहोत त्या देशाव्यतिरिक्त दुसऱ्या देशाला पाठिंबा देणे थोडे कठीण असते. ऑस्ट्रेलिया ऍशेस संघात यष्टिरक्षक म्हणून स्थान मिळवण्यासाठी ऍलेक्स केरीदेखील स्पर्धेत आहे.
ऍशेससाठी ऑस्ट्रेलियाचा संघ
पॅट कमिन्स, कॅमेरून ग्रीन, मार्कस हॅरिस, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, नॅथन लियॉन, मायकेल नेसर, झाय रिचर्डसन, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, मिचेल स्वीपसन, डेविड वॉर्नर.