इंडियन प्रीमीयर लीगच्या १४ व्या हंगामाचा लिलाव १८ फेब्रुवारीला चेन्नई येथे पार पडला. या लिलावात अनेक परदेशी खेळाडूंना घसघशीत रक्कम मिळाली. याच लिलावात ख्रिस मॉरीस हा आयपीएल इतिहासातील सर्वाधिक बोली लागलेला खेळाडू ठरला. त्याच्यासाठी राजस्थान रॉयल्सने १६.२५ कोटी रुपये मोजले. त्याच्याशिवाय ग्लेन मॅक्सवेल, काईल जेमिसन, झाय रिचर्डसन अशा खेळाडूंनाही कोट्यावधी रुपयांची बोली लागली.
एकीकडे काही परदेशी खेळाडूंनी कोट्यावधींची बोली लागलेली असताना दुसरीकडे काही स्टार खेळाडूंना मात्र कोणत्याच संघाने पसंती दाखवली नाही. यात न्यूझीलंडचा क्रिकेटपटू डेवॉन कॉनवेचाही समावेश आहे. त्याला देखील अन्य काही क्रिकेटपटूंप्रमाणे कोणीही पसंती दाखवली नाही. मात्र, त्याने या लिलावानंतर सोमवारी(२२ फेब्रुवारी) न्यूझीलंडकडून ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळताना ताबडतोड फलंदाजी केली. ही फलंदाजी पाहून भारताचा फिरकीपटू आर अश्विननेही प्रतिक्रिया देत म्हटले की त्याने ४ दिवस उशीरा अशी खेळी केली.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध पहिल्या टी२०मध्ये चमकला कॉनवे
सोमवारपासून न्यूझीलंडची ऑस्ट्रेलियाविरुद्ध ५ सामन्यांची टी२० मालिका सुरु झाली आहे. या मालिकेतील पहिल्याच सामन्यात कॉनवेने ५९ चेंडूच १० चौकार आणि ३ षटकारांसह नाबाद ९९ धावा केल्या. त्याच्या या खेळीमुळे न्यूझीलंडला प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ५ बाद १८५ धावा करता आल्या. त्यानंतर न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी मिळून ऑस्ट्रेलियन संघाला १३१ धावांवरच रोखत हा सामना ५३ धावांनी जिंकला. न्यूझीलंडकडून इश सोधीने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या.
आयपीएलमध्ये कॉनवे, सोधी अनसोल्ड
आयपीएलच्या १४ व्या हंगामासाठी झालेल्या लिलावात इश सोधी आणि कॉनवेनेही नाव नोंदवले होते. या दोघांची मुळ किंमत प्रत्येकी ५० लाख होती. मात्र या दोघांनाही कोणत्याच संघाने पसंती दाखवली नाही.
अश्विनचे कॉनवेसाठी ट्विट –
कॉनवेने ऑस्ट्रेलियाविरुद्ध केलेल्या नाबाद ९९ धावांच्या खेळीनंतर अश्विनने ट्विट केले की ‘डेवॉन कॉनवे केवळ ४ दिवस उशीर झाला, पण तुझी खेळी मस्त होती.’
अश्विनच्या या ट्विटनंतर असा कयास लावला जात आहे की अश्विनला या ट्विटमधून अप्रत्यक्षरित्या म्हणायचे असावे की जर कॉनवेने आयपीएल लिलावाच्या आधी अशी खेळी केली असती, तर त्याला कोणत्यातरी संघाने खरेदी केले असते. कॉनवेने लिलावानंतर ४ दिवसांनी ही खेळी करुन उशीर केला.
Devon Conway is just 4 days late, but what a knock 👏👏👏 #AUSvNZ
— Ashwin 🇮🇳 (@ashwinravi99) February 22, 2021
आयपीएल २०२१ च्या लिलावात संघांनी पसंती न दाखवलेल्या स्टार आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंमध्ये कॉनवे आणि सोधी व्यतिरिक्त ऍरॉन फिंच, मॅथ्यू वेड, टीम साऊथी, जेसन रॉय, मॉर्ने मॉर्केल, मार्नस लॅब्यूशेन, कॉलिन मुनरो, मार्टिन गप्टील अशा अनेक खेळाडूंचा समावेश आहे.
कॉनवेने टी२०मध्ये केली आहे चांगली कामगिरी –
कॉनवेने न्यूझीलंडसाठी ७ आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले असून यात त्याने तब्बल ९१ च्या सरासरीने २७३ धावा केल्या आहेत. त्याने यादरम्यान ३ अर्धशतके झळकावली आहेत. याशिवाय २९ वर्षीय कॉनवेने ८७ ट्वेंटी-ट्वेंटी क्रिकेट प्रकारातील सामने खेळले असून ४४.६८ च्या सरासरीने २९४९ धावा केल्या आहेत. यामध्ये त्याच्या २ शतकांचा आणि २२ अर्धशतकांचा समावेश आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
“धोनीच्या नेतृत्वात खेळणे म्हणजे स्वप्नपूर्ती”, सीएसकेत निवड झालेल्या क्रिकेटपटूने दिली प्रतिक्रिया
चमिंडा वासने तीन दिवसातच प्रशिक्षक पदाचा राजीनामा दिल्याने उडाली खळबळ; ‘हे’ आहे कारण
ब्रॉड की अँडरसन ? कोण खेळणार तिसऱ्या कसोटीत, स्वतः ब्रॉडने दिले उत्तर