विराट कोहलीने सोमवार, (12 मे) रोजी कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली, ज्यामुळे खेळाच्या सर्वात प्रदीर्घ स्वरूपातील 14 वर्षांच्या उल्लेखनीय कारकिर्दीचा शेवट झाला. विराट कोहलीने निवृत्त होण्याबद्दल माहिती देताच संपूर्ण सोशल मीडियावर कॉमेंट्स आणि पोस्ट्सचा पूर आला. हरभजन सिंग, इरफान पठाण ते एबी डिव्हिलियर्सपर्यंत सर्वांनी कोहलीच्या शानदार कसोटी कारकिर्दीबद्दल अभिनंदन केले आहे. प्रत्येक खेळाडूने विराट साठी एक खास मॅसेज, पोस्ट आणि त्याचा सोबतच्या आठवणी शेअर केल्या आहेत.
त्यातच तिलक वर्माने देखील विराटसाठी इंस्टाग्रामवरती एक खास स्टोरी शेअर केली आहे. विराटने त्याला दिलेले मार्गदर्शन व प्रोत्साहन या बद्दल त्याने लिहिले आहे. तिलक वर्माने म्हटले आहे की,’ विराटमुळे मी फिटनेस, डायटवर लक्ष द्यायला लागलो. विराटभाईंनी आम्हाला केवळ प्रेरणा दिली नाही तर शिस्त शिकवली. त्यामुळे आम्ही एवढ्या मोठ्या स्तरावर खेळू शकतो. मैदानावरचा व मैदानाबाहेरचा खराखुरा दिग्गज.
त्याच्या 14 वर्षांच्या दीर्घ कसोटी कारकिर्दीत, विराट कोहलीने फलंदाज म्हणून सर्वकाही साध्य केले. 2011 मध्ये कोहलीने कसोटी क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच फलंदाजी केली आणि वेस्ट इंडिजविरुद्ध मैदानात उतरला. तेव्हा कदाचित कोणीही विचार केला नसेल की कोहली इतका ‘विराट’ झाल्यानंतर या फॉरमॅटला निरोप देईल. कोहलीने भारतासाठी पांढऱ्या जर्सीमध्ये 123 कसोटी सामने खेळले. या काळात, किंग कोहलीने 210 डावांमध्ये 46 च्या सरासरीने 9230 धावा केल्या. विराटच्या बॅटमधून 30 शतके आली आणि त्याने 31 वेळा अर्धशतक ओलांडले.






