भारत आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या ४ कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघाने इंग्लंड संघाचा ३-१ ने धुव्वा उडवला होता. तसेच १२ मार्चपासून टी-२० मालिकेचे आव्हान भारतीय संघासमोर असणार आहे. या मालिकेत भारतीय संघात युवा खेळाडूंना प्राधान्य देण्यात आले आहे.
अशातच पहिल्या सामन्यासाठी संघात स्थान मिळवण्यासाठी खेळाडूंमध्ये चुरस पाहायला मिळत आहे. तसेच कसोटी मालिकेत आक्रमक फलंदाजी आणि उत्कृष्ट यष्टिरक्षण करणाऱ्या रिषभ पंतला देखील या मालिकेत स्थान देण्यात आले आहे. परंतु पहिल्या टी-२० सामन्यात रिषभ पंतचे खेळणे कठीण आहे. त्याऐवजी केएल राहुल यष्टीरक्षक-फलंदाज म्हणून भारतीय संघासाठी पहिला टी-२० सामना खेळू शकतो.
तीन खेळाडू आहेत दावेदार
भारतीय संघाने इंग्लंड विरुद्ध होणाऱ्या मालिकेसाठी तीन आक्रमक यष्टीरक्षक फलंदाजांची निवड केली आहे. यामध्ये केएल राहुल, रिषभ पंत आणि ईशान किशन यांचा समावेश आहे. ईशान किशनने विजय हजारे ट्रॉफी २०२१ मध्ये आपल्या आक्रमक फलंदाजीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते. त्यामुळे त्याला या मालिकेत संधी देण्यात आली आहे.
परंतु मालिकेतील पहिल्या सामन्यात रिषभ पंत आणि केएल राहुल यांच्यात स्पर्धा पाहायला मिळू शकते. केएल राहुल अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज आहे तसेच त्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये तो मैदानात यष्टिरक्षणाचा सराव करताना दिसून येत आहे. यावरून असे दिसून येत आहे की, पहिल्या टी-२० सामन्यात विराट कोहली केएल राहुलला यष्टिरक्षणाची जबाबदारी देऊ शकतो.
ईशान किशन पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणार आहे. त्यामुळे त्याचे पहिल्या टी-२० सामन्यात खेळणे कठीण आहे. परंतु केएल राहुल प्रबळ दावेदार आहे. न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया मध्ये झालेल्या टी-२० मालिकेत केएल राहुलने यष्टीरक्षक फलंदाजाची भूमिका पार पाडली होती. या मालिकांमध्ये त्याने भारतीय संघासाठी यष्टीरक्षणासह फलंदाजीत देखील उत्तम कामगिरी केली होते.
त्यामुळेच रिषभ पंतला संघात संधी मिळणे कठीण दिसून येत आहे. कारण या मालिकेसाठी ५ व्या क्रमांकावर सूर्यकुमार यादवची निवड करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत विराट कोहली पहिल्या सामन्यासाठी कोणत्या ११ खेळाडूंना संधी देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या:
कसोटीत दोन्ही डावात शतक करणारे ६ भारतीय दिग्गज फलंदाज
आयसीसी मधील भारतीय अधिकाऱ्यावर गंभीर आरोप, निलंबनाची कारवाई होण्याची शक्यता