कबड्डी मास्टर्स २०१८ च्या स्पर्धेत भारत आणि इराणनंतर उपांत्य फेरीत दक्षिण कोरिया आणि पाकिस्तानने प्रवेश केला आहे.
या स्पर्धेच्या सहाव्या दिवशी म्हणजेच बुधवार दि. २७ जूनला ब गटातून दक्षिण कोरियाने अर्जेंटीनाचा तर अ गटातून पाकिस्तानने केनियाचा पराभव करत उपांत्य फेरीचे तिकीट नक्की केले.
काल झालेल्या ब गटाच्या पहिल्या सामन्यात दक्षिण कोरियाने अर्जेंटीनाचा ५४-२५ असा पराभव करत उपांत्य फेरी गाठली.
सामन्याच्या सुरवातीला ८-६ अशी आघाडी घेतलेल्या अर्जेंटीनाला ही आघाडी कायम राखता आली नाही.
अनुभवी दक्षिण कोरियन संघाने सामन्यात दमदार पुनरागमन करत नवख्या अर्जेंटीनाला पराभूत केले.
तर अ गटाच्या दुसऱ्या सामन्यात तगड्या पाकिस्तान संघाने दुबळ्या केनियाचा ४२-२० अशा फरकाने पराभव केला.
पहिल्या हाफमध्ये २२-७ अशी आघाडी घेतलेल्या पाकिस्तानने ही आघाडी वाढवत सामना संपताना ४२-२० अशी केली.
संपूर्ण सामन्यात केनियावर पाकिस्तानने वर्चस्व गाजवत सामना जिंकला.
शुक्रवार दि. २९ जूनला कबड्डी मास्टर्स २०१८ स्पर्धेचे दोन्ही उपांत्य फेरीचे सामने होणार आहेत.
पहिल्या सामन्यात विश्वविजेत्या भारतीय संघाची दक्षिण कोरियाशी लढत होईल तर दुसऱ्या सामन्यात बलाढ्य इराणशी पाकीस्तानला दोन हात करावे लागतील.
महत्त्वाच्या बातम्या-
-क्रिकेटमधील भागीदारीच नाव घ्याल तर रोहित शर्मा-शिखर धवन जोडीला तोड नाही
-१२ महिन्यात एकही वनडेत संधी न मिळालेला भारतीय गोलंदाज विश्वचषकासाठी आशावादी