बोनसचा बादशाहा अशी ओळख मिळवणाऱ्या अनुप कुमारने मागील आठवड्यात आपल्या 15 वर्षाच्या कबड्डीतील कारकिर्दीला रामराम ठोकला.
अनुपमध्ये असणाऱ्या खिलाडूवृत्ती आणि नेतृत्व गुणांमुळे त्याच्या संघसहकाऱ्यांनी त्याला कॅप्टन कूल असे टोपन नावही दिले आहे. पण आता त्याने निवृत्ती घेतल्याने तो कबड्डीच्या मैदानात दिसणार नाही.
अनुपचा जन्म 20 नोव्हेंबर 1983 मध्ये हरियाणामधील पलडा नावाच्या गावात झाला. त्याच्या कुटुंबातील तो सर्वात लहान सदस्य आहे. त्याचे वडील भारतीय सेनेत मेजर होते. त्याची कबड्डी खेळण्याची सुरुवात शाळेतच झाली. पण तो त्यावेळी फक्त हा खेळ आवडतो म्हणून खेळत होता.
पण जेव्हा त्याने पाहिले की आजूबाजूच्या गावातील मित्रांना कबड्डीची मॅच जिंकल्यानंतर टॉवेल, प्लेट्स, टी-शर्ट्स असे बक्षिस मिळते तेव्हा त्याची या खेळातील आवड वाढली.
त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची सुरुवात 2006 मध्ये श्रीलंकेत झालेल्या एशियन गेम्समधून झाली. त्यानंतर तो भारतीय कबड्डी संघाचा नियमित सदस्य बनला. तो 2010 आणि 2014 मध्ये एशियन गेम्समध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या भारतीय संघाचा सदस्य होता. तसेच 2014 मध्ये त्याने या स्पर्धेत भारताचे नेतृत्व केले होते.
2016 मध्ये त्याच्या नेतृत्वाखाली भारताने विश्वचषकाचे विजेतेपदही मिळवले. हे भारताचे सलग तिसरे विश्वविजेतेपद होते.
प्रो कबड्डीमध्ये अनुप पहिल्या मोसमापासून यू मुम्बाकडून खेळत होता. त्याच्या नेतृत्वाखाली यू मुम्बाने अंतिम फेरीत मजलही मारली होती. त्याला पहिल्या मोसमात सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कारही मिळाला. त्याच्या नेतृत्वाखाली 2015 मध्ये यू मुम्बाने प्रो कबड्डीचे विजेतेपदही मिळवले आहे. तो यू मुम्बाकडून 2017 पर्यंत खेळला.
त्यानंतर 2018 च्या 6 व्या मोसमासाठी त्याला जयपूर पिंक पँथर्स संघाने संघात सामील करुन घेतले. तो प्रो कबड्डीच्या इतिहासात 400 रेड पॉइंट्स मिळवणारा पहिला कबड्डीपटू ठरला होता.
35 वर्षीय अनुपने प्रो कबड्डीत आजपर्यंत 91 सामन्यात 596 गुणांची कमाई केली आहे. सर्वाधिक गुण घेणाऱ्या खेळाडूंमध्ये तो 6व्या स्थानावर आहे.
अनुपला 2012 मध्ये अर्जून पुरस्कारानेही सन्मानीत करण्यात आले आहे. सध्या तो हरियाणा पोलिस विभागात डीसीपी आहे. तसेच त्याने याआधी एअर इंडिया आणि सीआरपीएफमध्येही काम केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
–भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार: भाग १९- मुंबईचा ९११
–विजय- राहुलला डच्चू, हे दोन खेळाडू करणार टीम इंडियाची ओपनिंग ?