प्रो कबड्डीमध्ये आज यु मुंबा आणि बेंगलूरु बुल्स हे आमने-सामने येणार आहेत. आजच्या सामन्यात यु मुंबाचा स्टार रेडर आणि महाराष्ट्रातील कबड्डीप्रेमींच्या गळ्यातला ताईत असणारा काशीलिंग आडके एक नवीन विक्रम आपले नावे नोंदवणार आहे.
यु मुंबाचा हा खेळाडू आपल्या ‘हनुमान उडी’ साठी भारतभर ओळखला जातो. त्याच्या टो टच आणि रानिंग हँड टचच्या कौशल्याचे तर सर्व दिवानेच आहेत. या मोसमाच्या सुरुवातीच्या काही सामन्यात काशीलिंग थोडा अपयशी ठरला होता. त्यामुळे यु मुंबा संघाच्या कामगिरीवर देखील त्याचा परिणाम होऊन यु मुंबाचा संघ मजबूत भासत नव्हता. परंतु काशीने जेव्हापासून लय मिळवली आहे तेव्हा पासून यु मुंबा रेडींगमध्ये सर्वात मजबूत संघ भासत आहे.
आजच्या सामन्यात जेव्हा यु मुंबाचा संघ बेंगलूरु बुल्सशी चार हात करण्यास उतरले तेव्हा महाराष्ट्राच्या लाडक्या खेळाडूला मोठा विक्रम करण्याची संधी आहे. या सामन्यात जर काशीने तीन गुण मिळवले तर तो प्रो कबड्डीमध्ये एकूण ५०० गुण मिळवण्याऱ्या काही मोजक्या खेळाडूंच्या यादीत सहभागी होईल. तो ५०० गुण मिळवणारा केवळ चौथा खेळाडू ठरेल. सध्या काशीच्या नावावर ६८ सामने खेळताना एकूण ४९७ गुण आहेत. त्यापैकी ४६४ गुण त्याने रेडींगमध्ये कमावले आहेत तर ३३ गुण त्याने डिफेन्समध्ये कमावले आहेत.
काशीलिंगचा मागील काही सामन्यातील खेळ पाहता तो या सामन्यात हा नक्की हि कामगिरी करेल हे निश्चित आहे. मागील चारही मोसमातील त्याच्या कामगिरीचा आढावा.
# प्रो कबड्डीच्या पहिल्या मोसमात १४ सामने खेळताना त्याने एकूण १२२ गुण मिळवले होते. या मोसमात सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तो पाचवा होता.
#प्रो कबड्डीच्या दुसऱ्या मोसमात १४ सामने खेळताना त्याने सर्वाधिक ११७ गुण मिळवले होते. या मोसमाचा ‘बेस्ट रेडर’ पुरस्कार देखील काशीलिंगला दिला गेला होता.
# प्रो कबड्डीच्या तिसऱ्या मोसमात काशीलिंगने ११ सामने खेळताना ७८ गुणांची कमाई केली. तो या मोसमात सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या खेळाडूंच्या यादीत दहावा होता.
# प्रो कबड्डीच्या चौथ्या मोसमात १३ सामने खेळताना काशीलिंगने ८९ गुण मिळवले होते. या मोसमात सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तो पाचव्या क्रमांकावर होता.
# प्रो कबड्डीच्या पाचव्या मोसमात काशीलिंगने सध्या १६ सामने खेळले असून त्यात त्याने एकुण ९१ गुण मिळवले आहेत. त्यात ८४ गुण त्याने रेडींगमध्ये तर उर्वरित ७ गुण त्याने डिफेन्समध्ये कमवले आहेत.
# ५०० किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळवणारे खेळाडू-
राहुल चौधरी (६६२ गुण ), अनुप कुमार (५१३गुण ), प्रदीप नरवाल (५०१गुण )