दुबई येथील दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर सातव्या टी२० विश्वचषकाचा अंतिम सामना ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या देशांदरम्यान खेळला जात आहे. या महत्त्वपूर्ण सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार ऍरॉन फिंचने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी शानदार गोलंदाजी करत न्यूझीलंडचा डाव १७२ धावांवर रोखला. मात्र, न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सनने ८५ धावांची खेळी करत संघाला सन्मानजनक धावसंख्या उभारून दिली. यासह त्याने एका अनोख्या विक्रमाला गवसणी घातली.
विलियम्सनने सांभाळला डाव
डेरिल मिशेलच्या रूपाने पहिला गडी गमावल्यानंतर केन विलियम्सन फलंदाजीसाठी आला. सुरुवातीला त्यानेदेखील सावध पवित्रा घेतला. मात्र, ११ व्या षटकापासून त्यांनी आक्रमक रूप धारण केले. ऑस्ट्रेलियाचा प्रमुख गोलंदाज मिचेल स्टार्कला त्याने लक्ष करत चांगलीच धावांची लयलूट केली. त्याने बाद होण्यापूर्वी ४८ चेंडूत १० चौकार व ३ षटकार ठोकून १७७ च्या स्ट्राईक रेटने ८५ धावा ठोकल्या. हे त्याचे स्पर्धेतील पहिले अर्धशतक ठरले.
अशी कामगिरी करणारा पहिला फलंदाज बनला केन
टी२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात अर्धशतक झळकावून विलियम्सनने एका अद्भुत विक्रमाला गवसणी घातली. विलियम्सन आता तिन्ही प्रकारच्या आयसीसी स्पर्धांच्या बाद फेरीत अर्धशतके ठोकणारा पहिला फलंदाज बनला आहे. त्याने २०१९ वनडे विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत भारतीय संघाविरुद्ध ६७ धावांची खेळी केली होती. त्यानंतर, यावर्षी जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात भारताविरुद्धच दुसऱ्या डावात त्याने नाबाद ५२ धावांची खेळी केलेली. त्यानंतर आता या अंतिम सामन्यात ८५ धावांची खेळी त्याने केली आहे.
न्यूझीलंडची सन्मानजनक धावसंख्या
फलंदाजीचे आमंत्रण मिळाल्यानंतर न्यूझीलंड संघाने आपला पहिला बळी लवकर गमावला. त्यानंतर, मार्टिन गप्टिल याने २४ धावांचे योगदान दिले. कर्णधार केन विलियम्सनने ८५ धावांची लाजवाब खेळी करत संघाला १७२ पर्यंत मजल मारून दिली. ऑस्ट्रेलियासाठी जोश हेजलवूडने तीन बळी आपल्या नावे केले.