शुक्रवारी (13 ऑक्टोबर) चेन्नई येथील एमए चिदंबरम स्टेडिअममध्ये वनडे विश्वचषक स्पर्धेत न्यूझीलंड विरुद्ध बांगलादेश संघ आमने-सामने होते. हा एकतर्फी सामना न्यूझीलंडने 43 चेंडू शिल्लक ठेवून 8 विकेट्सने जिंकला. हा न्यूझीलंडचा नियमित कर्णधार केन विलियम्सन याचा पुनरागमनाचा सामना होता. त्याने या सामन्यात 79 धावांची शानदार खेळी केली. मात्र, दुखापतीमुळे त्याला रिटायर्ड हर्ट व्हावे लागले. त्यानंतर आता त्याचा दुखापतीविषयी मोठी अपडेट समोर येत आहे.
बांगलादेशविरुद्ध 246 धावांचा पाठलाग करताना केन याने शानदार फलंदाजी केली. मात्र फलंदाजी करत असताना बांगलादेशच्या एका क्षेत्ररक्षकाने थ्रो केलेला चेंडू थेट त्याच्या डाव्या हाताच्या अंगठ्यावर लागला. त्यानंतर त्याने रिटायर्ड होण्याचा निर्णय घेतला.
शनिवारी सकाळी स्कॅन झाल्यानंतर त्याच्या दुखापतीविषयी अपडेट मिळाली. त्याच्या अंगठ्याला फ्रॅक्चर झाले असून, तो तीन आठवडे तरी मैदानात उतरण्याची शक्यता नाही. या कारणाने न्यूझीलंड संघ व्यवस्थापनाने टॉम ब्लंडल याला बॅकअप म्हणून बोलावले आहे. केन यादरम्यान संघासोबतच राहणार असून, तो विश्वचषकातून बाहेर झालेला नाही.
या सामन्यात बांगलादेश संघ प्रथम फलंदाजीला उतरला होता. यावेळी त्यांनी निर्धारित 50 षटकात 9 विकेट्स गमावत 245 धावा केल्या होत्या. बांगलादेश संघासाठी कर्णधार शाकिब अल हसन, मुशफिकूर रहीम व महमदुलाह यांनी उत्कृष्ट फलंदाजी केली. या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडने 42.5 षटकात 2 विकेट्स गमावत 248 धावा करून सामना खिशात घातला. केन विलियम्सन व डॅरिल मिचेल यांनी अर्धशतके झळकावली. तीन बळी घेणारा लॉकी फर्ग्युसन हा सामनावीर ठरला.
(Kane Williamson has fractured his left thumb; Tom Blundell has been called in as cover)
हेही वाचा-
पाकिस्तानविरुद्ध भारताचा ‘हा’ गोलंदाज ठरेल गेमचेंजर; इंग्लंडच्या विश्वविजेत्या कर्णधाराला विश्वास
याला म्हणतात INDvsPAK सामन्याची क्रेझ! चाहत्यांनी स्टेडिअमबाहेर केली तुफान गर्दी, पाहा व्हिडिओ