टी२० विश्वचषक २०२१ चा अंतिम सामना रविवारी (१४ नोव्हेंबर) दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियामवर खेळला गेला. अंतिम सामन्यात केन विलियम्सनच्या नेतृत्वातील न्यूझीलंड आणि ऍरॉन फिंचच्या नेतृत्वातील ऑस्ट्रेलिया संघ आमने सामने होते. न्यूझीलंडने या सामन्यात प्रथम फलंदाजी केली. न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सनने या सामन्यात महत्वाची खेळी केली आणि संघाच्या मोठ्या धावसंखेत महत्वाचे योगदान दिले. केन विलियम्सनने या सामन्यात त्याचे अर्धशतक पूर्ण केले आणि एका खास यादीत तो सामील झाला आहे.
टी२० आणि एकदिवसीय विश्वचषकाचा अंतिम किंवा उपांत्य सामना प्रत्येक संघासाठी महत्वाचे असतात आणि या सामन्यात ५० किंवा त्यापेक्षा जास्त धावा करणे, हे संघासाठी दिलेले खूपच मोलाचे योगादन ठरते. आतापर्यंत टी२० आणि एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम किंवा उपांत्य सामन्यात ५० किंवा त्यापेक्षा जास्त धावा करणाऱ्यांचा विचार केला तर, या यादीत खूपच कमी नावाचा समावेश आहे. केन विलियम्सनचा या यादीत नव्याने सामावेश झाला आहे.
त्याने रविवारी टी२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात एकूण ४८ चेंडूंचा सामना केला आणि ८५ धावा केल्या. त्याने या धावा १० चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने केल्या आहेत. यापूर्वी विलियम्सनने २०१९ एकदिवसीय विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यात भारताविरुद्ध ६७ धावांची खेळी केली होती. त्यामुळे टी२० आणि एकदिवसीय विश्वचषकाचा अंतिम किंवा उपांत्य सामन्यात ५० पेक्षा अधिक धावांची खेळी करणारा तो ७ वा क्रिकेटपटू ठरला आहे.
यापूर्वी ही कामगिरी करणाऱ्यांचा विचार केला तर, यामध्ये भारताचा दिग्गज सलामीवीर गौतम गंभीर, दक्षिण अफ्रिकेचा माजी अष्टपैलू जॅक कॅलिस, श्रीलंका संघाचा माजी कर्णधार कुमार संगकारा, श्रीलंकेचा माजी दिग्गज क्रिकेटपटू तिलकरत्ने दिलशान, दक्षिण अफ्रिकेचा फाफ डू प्लेसिस, इंग्लंड संघाचा जेसन रॉय यांचा समावेश होता. रविवारी पार पडलेल्या सामन्यानंतर केन विलियम्सन या यादीत नव्याने सामील झाला आहे.
दरम्यान, या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकली आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ४ विकेट्सच्या नुकसानावर १७२ धावा केल्या. न्यूझीलंड संघाने ज्या चार विकेट्स गमावल्या, त्यापैकी तीन विकेट्स ऑस्ट्रेलियाच्या एकट्या जोस हेजलवुडने घेतल्या. त्याने त्याच्या चार षटकात अवघ्या १६ धावा दिल्या. त्याव्यतिरिक्त ऑस्ट्रेलियाच्या ऍडम झम्पाने एक विकेट्स घेतला आणि २६ धावा दिल्या. न्यूझीलंडसाठी सर्वाधिक धावा केन विलियम्सनने केल्या.
त्यानंतर ऑस्ट्रेलियाकडून डेविड वॉर्नरने ५३ आणि मिशेल मार्शने नाबाद ७७ धावांची खेळी करत ऑस्ट्रेलियाला विजतेपद मिळवून दिले. या दोघांच्या अर्धशतकाच्या बळावर ऑस्ट्रेलियाने १८.५ षटकांत ऑस्ट्रेलियाने १७३ धावांचे आव्हान २ विकेट्स गमावत पूर्ण केले.
महत्त्वाच्या बातम्या –
टी२० विश्वचषक जिंकला, पण ऑस्ट्रेलियाचा मिशेल स्टार्क ठरला सर्वात महागडा गोलंदाज, पाहा आकडेवारी
मॅचविनिंग खेळीसह मार्शने बनवला विश्वचषक अंतिम सामन्यातील सर्वात मोठा विक्रम; दिग्गजांना सोडले मागे