न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान यांच्यादरम्यान टी२० मालिकेतील दुसरा सामना हॅमिल्टन येथे संपन्न झाला. यजमान न्यूझीलंडने पाकिस्तानला ९ गड्यांनी पराभूत करत तीन सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. पाकिस्तानने दिलेल्या १६४ धावांच्या आव्हानाचा न्यूझीलंडने अवघा एक गडी गमावत यशस्वी पाठलाग केला. न्यूझीलंडला मालिका विजय मिळवून देण्यात त्यांचा कर्णधार केन विलियम्सनने महत्त्वाची भूमिका बजावली. विलियम्सनने नाबाद अर्धशतकी खेळी केली. या खेळीदरम्यान विलियम्सनने खेळलेला अपर कटचा फटका पाहून अनेक जण अवाक झाले.
न्यूझीलंडने साजरा केला मालिका विजय
तीन सामन्यांच्या टी२० मालिकेतील या दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. पाकिस्तानकडून अनुभवी मोहम्मद हफिजने ५७ चेंडूत नाबाद ९९ धावांची खेळी केली. यात १० चौकार व ५ उत्तुंग षटकारांचा समावेश होता. न्यूझीलंडकडून टीम साऊदीने सर्वाधिक चार बळी आपल्या नावे केले.
प्रत्युत्तरात, न्यूझीलंडने मार्टिन गुप्टीलला गमावत अखेरच्या षटकात १६४ धावांचे विजयी लक्ष पूर्ण केले. यष्टीरक्षक सलामीवीर टिम सिफर्ट याने ६३ चेंडूत ८४ धावांची वादळी खेळी केली. पहिल्या सामन्याला मुकलेल्या कर्णधार केन विलियम्सनने पुन्हा एकदा आपली गुणवत्ता दाखवत ४२ चेंडूत ५७ धावांची खेळी साकारली. या विजयासह न्यूझीलंडने टी२० मालिकेवर कब्जा केला.
विलियम्सनचा लाजवाब अपर कट
न्यूझीलंडच्या डावाच्या तेराव्या षटकात विलियम्सनने एक अप्रतिम फटका खेळत सर्वांना आश्चर्यचकित केले. हारीस रौफने षटकातील पाचवा चेंडू काहीसा आखूड टप्प्याच्या टाकला. त्यावर, विलियम्सनने एक अफलातून अपर कट मारत ६ धावा वसूल केल्या. त्याचा हा फटका पाहून समालोचक स्तुती करू लागले. दुखापतीमुळे या सामन्यात खेळत नसलेला पाकिस्तानचा नियमित कर्णधार बाबर आझम यानेदेखील चेहऱ्यावरील हावभावावरून फटक्याचे कौतुक केले. एका चाहत्याने त्या फटक्याचा व्हिडिओ ट्विटरवरुन शेअर करताना लिहिले,
‘क्लासी केन…त्याने तुम्हाला ठार मारले तरी तुम्हाला समजले नाही.’
https://twitter.com/BeingUk7/status/1340582220415729664
न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यादरम्यानच्या मालिकेतील तिसरा टी२० सामना मंगळवारी खेळला जाईल. त्यानंतर उभय संघांमध्ये दोन कसोटी सामन्यांची मालिका होईल. न्यूझीलंड ही मालिका जिंकून जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमध्ये पहिल्या दोन जागांवर राहण्याचा प्रयत्न करेल.
महत्वाच्या बातम्या:
– दुर्दैव! ९९ धावांवर नाबाद राहिल्याने त्या चार कमनशिबी खेळाडूंमध्ये सामील झाला हफिज
– शिक्कामोर्तब! कोरोनानंतरही याच मैदानावर होईल भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरी कसोटी
– ही माणसं माझ्याबाबत लोकांच्या मनात विष भरत होती; तडकाफडकी निवृत्तीनंतर आमिरचा धक्कादायक खुलासा






