इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामातील पहिला टप्पा आता संपत आला असून लवकरच दुसरा टप्पा सुरु होत आहे. दरम्यान, शनिवारी (१ मे) सनरायझर्स हैदराबाद संघाने उर्वरित हंगामासाठी डेव्हिड वॉर्नरला कर्णधारपदावरुन दूर करुन केन विलियम्सनकडे नेतृत्वाची धूरा सोपवली आहे.
याबद्दल हैदराबादने ट्विटरवरुन माहिती दिली आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की ‘केन विलियम्सन उद्याच्या(२ मे) सामन्यात तसेच उर्वरित हंगामात संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी घेईल.’
त्याचबरोबर हैदराबादने असेही म्हटले आहे की ‘हा निर्णय सोपा नव्हता. संघव्यवस्थापनाला डेव्हिड वॉर्नरच्या कित्येक वर्षांपासून फ्रँचायझीवर असलेल्या परिणामांचा आदर आहे. आम्हाला विश्वास आहे की वॉर्नर मैदानात आणि मैदानाबाहेर उर्वरित हंगामासाठी योगदान देत राहिल, असा विश्वास आहे.’
🚨 Announcement 🚨 pic.twitter.com/B9tBDWwzHe
— SunRisers Hyderabad (@SunRisers) May 1, 2021
याबरोबरच त्यांनी असेही सांगितले आहे की २ मे रोजी राजस्थान रॉयल्सविरुद्ध होणारा सामना हा हैदराबादसाठी अवे (प्रतिस्पर्धी संघ यजमान) सामना होता. तो आता हैदराबादसाठी घरचा सामना असेल. तर १३ मे रोजी या दोन संघात होणारा सामना राजस्थानसाठी घरचा सामना असेल.
आयपीएल २०२१ हंगामात हैदराबादची खराब कामगिरी
आयपीएल २०२१ हंगामात हैदराबादने आत्तापर्यंत वॉर्नरच्या नेतृत्वाखाली ६ सामने खेळले असून त्यातील केवळ १ सामना जिंकण्यात संघाला यश आले. तर ५ सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून वॉर्नरच्या नेतृत्वावर टीका होत होती.
हैदराबादने यापूर्वी वॉर्नरच्या नेतृत्वाखाली २०१६ साली आयपीएलचे विजेतेपद जिंकले आहे.
विलियम्सनने यापूर्वी केले आहे नेतृत्व
विलियम्सनने यापूर्वी हैदराबादचे नेतृत्व केले आहे. २०१८ च्या आयपीएल हंगामात वॉर्नरवर बंदी असताना विलियम्सनने संघाचे नियमित कर्णधारपद सांभाळले होते. त्याच्या नेतृत्वाखाली त्या हंगामात हैदराबादने अंतिम सामन्यात धडक मारली होती. पण अंतिम सामन्यात त्यांना चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला होता. त्याने २०१९ हंगामातही संघाचे नेतृत्व केले आहे. आत्तापर्यंत हैदराबादचे त्याने २६ सामन्यांत नेतृत्व केले असून १४ सामन्यात विजय आणि ११ सामन्यात पराभव स्विकारले आहेत.