महिला कुस्तीपटू विनेश फोगटनं पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये इतिहास रचला आहे. तिनं 50 किलो वजनी गटाच्या उपांत्य फेरीत क्युबाची कुस्तीपटू युस्नेलिस गुझमन हिला पराभूत करून फायनलमध्ये प्रवेश केला. यासह विनेश ऑलिम्पिकच्या फायनलमध्ये पोहोचणारी पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली आहे.
कुस्तीपटू विनेश फोगटच्या या मोठ्या विजयावर अभिनेत्री आणि हिमाचल प्रदेशच्या मंडी येथील भाजपा खासदार कंगना रनौतनं आपली प्रतिक्रिया दिली आहे. तिनं तिच्या इन्स्टा स्टोरीवर लिहिलं की, “भारताला पहिलं सुवर्ण मिळावं यासाठी मी प्रार्थना करत आहे. विनेश फोगटनं एका वेळी त्या आंदोलनात भाग घेतला होता, ज्यात ‘मोदी तेरी कबर खुदेगी’ असे नारे लावले जात होते. तरीही तिला देशाचं प्रतिनिधित्व करण्याची संधी, उत्तम प्रशिक्षक आणि सुविधा देण्यात आल्या. हेच लोकशाहीचं आणि महान नेत्याचं वैशिट्य आहे.”
गेल्या वर्षी 29 वर्षीय कुस्तीपटू विनेश फोगटनं भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांच्यावर लैंगिक गैरवर्तनाचे आरोप केले होते. यानंतर, त्यांच्या विरोधातील आंदोलनांचं नेतृत्व करताना ती बराच काळ कुस्तीपासून दूर राहिली होती. मात्र, आता विनेश फोगटनं पॅरिस ऑलिम्पिकमधील आपल्या कामगिरीनं खळबळ उडवून दिली आहे. विनेश प्रथम 53 किलो वजनी गटात खेळायची. आता ती 50 किलोच्या गटात उतरली आहे.
विनेशनं उपांत्यपूर्व फेरीत युक्रेनच्या ओसाना लिवाचचा पराभव करून उपांत्य फेरीत स्थान निश्चित केलं होतं. तिनं आठव्या मानांकित कुस्तीपटूचा 7-5 असा पराभव केला होता. तर उपउपांत्यपूर्व फेरीत तिनं जपानच्या अव्वल मानांकित युई सुसाकीचा 3-2 असा पराभव करून मोठा इतिहास घडवला होता. आता अपेक्षा आहे की विनेश फायनलमध्ये अशीच दमदार कामगिरी करून भारताला या ऑलिम्पिकमधील पहिलं सुवर्ण पदक मिळवून देईल.
कंगना रनौतबद्दल बोलायचं झालं तर, तिनं हिमाचल प्रदेशातील मंडी येथून 2024 ची लोकसभा निवडणूक लढवली होती. ती भाजपाची उमेदवार होती. तिनं मंडीतून मोठा विजय मिळवला होता.
हेही वाचा –
आधी दुखापत, शस्त्रक्रिया आणि आंदोलन…पॅरिस ऑलिम्पिकपर्यंतचा प्रवास विनेश फोगटसाठी सोपा नव्हता
मराठमोळ्या अविनाशसह मीराबाई चानू ॲक्शनमध्ये, तर चार पदक सामने; पाहा भारताचे आजचे वेळापत्रक
Paris Olympics: सेमीफायलनमध्ये भारताचा जर्मनीकडून पराभव, हाॅकीमध्ये ‘सुवर्ण’पदकाच्या आशा संपल्या