सोमवारी (24 फेब्रुवारी) बेसिन रिझर्व येथे न्यूझीलंड विरुद्ध भारत (New Zealand vs India) संघात 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना पार पडला. हा सामना 10 विकेट्सने जिंकत न्यूझीलंडने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.
न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या पराभवानंतर भारताचे माजी कर्णधार कपिल देव (Kapil Dev) यांनी भारतीय संघावर जोरदार टीका केली आहे. यावेळी बोलताना कपिल म्हणाले की, “आपण न्यूझीलंड संघाची प्रशंसा करायला हवी. ते खूप उत्कृष्ट खेळत आहेत. 3 वनडे सामन्यात आणि कसोटी मालिकेत त्यांनी उत्कृष्ट खेळी केली आहे.”
“जर सामन्याचे विश्लेषन करून पहिले तर मला विश्वास बसत नाही की कोण एवढे बदल कसे करू शकतात. प्रत्येक सामन्यात टीम इंडियाचा नवीन संघ असतो. संघात कुणाचेही स्थान निश्चित नसते. जर संघात खेळाडूंचे स्थान पक्के नसेल, तर याचा परिणाम खेळाडूमच्या फॉर्मवर होतो.” असेही ते म्हणाले.
पहिल्या कसोटी सामन्यात खेळताना भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली, चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणेची फलंदाजी अयशस्वी ठरली. विराटने स्वत: संघाच्या फलंदाजीला पराभवाचे कारण असल्याचे देखील मान्य केले होते. याविषयी बोलताना कपिल म्हणाले की, “भारतीय संघातील फलंदाजांच्या यादीत अनेक मोठी नावे आहेत. तरीही, त्यांना 2 डावात मिळून 200 धावा करता आल्या नाहीत. याचा अर्थ आहे की, तुम्ही परिस्थितीशी ताळमेळ साधू शकत नाही. तुम्हाला रणनीतीवर अधिकाधिक लक्ष हे द्यावे लागेल.”
यासह कपिल केएल राहूलला संघात न घेतल्यामुळेही नाराज आहेत. राहूलला टी20 मालिकेत मालिकावीर पुरस्कार देण्यात आला होता आणि याच मालिकेत भारताने न्यूझीलंडला 5-0ने मातदेखील दिली होती.
यासंदर्भात पुढे बोलताना कपिल म्हणाले, “टी20 मालिकेत जसे आपण खेळलो होतो आणि कसोटीत आता जसे खेळत आहोत, यात खूप अंतर आहे. जेव्हा आपण संघ निवडत असतो तेव्हा आपल्या संघातील खेळाडूंना आत्मविश्वास द्यावा लागतो. पण, जर संघात खूप बदल केले तर याला काही अर्थ नसतो.”
कपिल पुढे म्हणाले की, “व्यवस्थापन प्रत्येक स्वरूपासाठी विशिष्ट खेळाडूवर विश्वास ठेवत असते. राहूल दमदार फॉर्ममध्ये आहे तरीही तो संघाबाहेर आहे. याला काहीच अर्थ नाही. मला वाटते की, खेळाडू जेव्हा फॉर्ममध्ये असतो तेव्हा त्याला खेळू द्यायला हवे. “असेही ते यावेळी म्हणाले.
भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात दुसरा आणि अखेरचा कसोटी सामना शनिवारी (29 फेब्रुवारी) क्राइस्टचर्च येथील हेग्ले ओवल स्टेडियमवर होणार आहे.






