भारतीय क्रिकेट संघाला अनेक महान क्रिकेटपटूंचे मार्गदर्शन लाभले आहे. त्यातीलच एक भारताचे माजी अष्टपैलू रवि शास्त्री हे सध्या संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी कार्यरत आहेत. त्यांच्या प्रशिक्षणाखाली भारतीय संघाने अनेक अशक्यप्राय विजय मिळवले आहेत. परंतु हा दिग्गज आजवर एकदाही भारतीय संघाला आयसीसी स्पर्धेत विश्वविजेता बनवण्यात यशस्वी ठरू शकला नाही. जागतिक कसोटी चँपियनशीप स्पर्धेतही भारताला अंतिम सामन्यात पोहोचूनही जेतेपदापासून वंचित राहावे लागले.
त्यामुळे महागुरु शास्त्रींच्या प्रशिक्षकपदावर टांगती तलवार आहे. टी२० विश्वचषक २०२१ नंतर त्यांचा कार्यकाळ संपणार आहे. यानंतर सध्या श्रीलंका दौऱ्यावरील भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक असलेले राहुल द्रविड त्यांची जागा घेतील, अशी चर्चा आहे. यावर भारताचे माजी विश्वविजेता कर्णधार कपिल देव यांनी आपले मत मांडले आहे.
एबीपी न्यूजशी बोलताना कपिल देव म्हणाले की, “मला नाही वाटत की आता या विषयावर चर्चा करणे योग्य असेल. भारताचा श्रीलंका दौरा संपू द्या. मग सर्वांना अंदाजा येईलच द्रविडच्या प्रशिक्षणाखाली भारतीय संघाचे प्रदर्शन कसे राहिले आहे. शास्त्रींच्या जागी नव्या प्रशिक्षकाचा विचार करणे चुकीचे नाही. परंतु जर त्यांच्या प्रशिक्षणाखाली भारतीय संघाने पुन्हा एकदा चांगले प्रदर्शन केले. तर त्यांची प्रशिक्षकपदावरुन हकालपट्टी करण्याची आवश्यकता नाही, असे मला वाटते. तरीही सर्वकाही वेळेनुसार स्पष्ट होईलच.”
एकंदरीत कपिल देव यांनी ना शास्त्रींची बाजू घेतली आहे ना द्रविडची. वेळेनुसार दोन्ही दिग्गजांच्या कामगिरीवर भारतीय संघाचा भावी प्रशिक्षक ठरेल, असे त्यांचे म्हणणे आहे.
शास्त्रींनी भारतीय संघाचे प्रशिक्षकपद सांभाळल्यापासून भारतीय संघाने २०१७ चॅम्पियन्स ट्रॉफी अंतिम सामना, २०१९ विश्वचषक उपांत्य फेरी सामना आणि विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना गमावला आहे. त्यामुळे त्यांच्याकडे आपले स्थान टिकवून ठेवण्यासाठी आगामी टी२० विश्वचषक ही शेवटची संधी असणार आहे. त्यांच्या प्रशिक्षणाचा कालावधी टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धेपर्यंतच आहे. म्हणून जर त्यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघाला टी२० विश्वचषक स्पर्धा जिंकण्यात यश आले, तर बीसीसीआय त्यांचा करार वाढवण्याबाबत विचार करू शकते.
महत्त्वाच्या बातम्या-
आऊटस्विंगर की इनस्विंगर? इंग्लिश गोलंदाजाच्या चतुर गोलंदाजीने गोंधळला फलंदाज, ‘अशी’ गमावली विकेट
द्रविडने नकार दिल्यास ‘हे’ ३ दिग्गज घेऊ शकतात टीम इंडियाचे महागुरु शास्त्रींची जागा
मोहम्मद अझरुद्दीन पुन्हा हैदराबाद क्रिकेट संघाच्या अध्यक्षपदी विराजमान, विरोधकांवर कारवाई