आंतरराष्ट्रीय टी २० सामन्यांमध्ये षटकारांचा किंग म्हणून भारताचा विश्वविजेता माजी कर्णधार रोहित शर्मा याचे वर्चस्व संपुष्टात आले आहे. त्याला ऑस्ट्रियाच्या खेळाडूने मागे टाकत पहिले स्थान बळकावले आहे. ऑस्ट्रिया क्रिकेट संघाचा कर्णधार करणबीर सिंगने टी 20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या खेळाडूंच्या यादीत अव्वल स्थान गाठले आहे.
करणबीरने २८ जूनला हंगेरीविरुद्धच्या ५७ चेंडूंमध्ये १६४ धावा केल्या. यामध्ये त्याने १८ चौकार आणि १२ षटकार मारले. त्याचबरोबर सर्वाधिक षटाकरांचा विक्रम आपल्या नावे केला.
रोहितने २०२४ मध्ये टी २० विश्वचषक जिंकल्यानंतर टी 20 आंतरराष्ट्रीयमधून निवृत्ती घेतली होती. तेव्हा त्याच्या नावावर १५१ डावांमध्ये २०५ षटकारांची नोंद होती आणि तो टी 20 आंतरराष्ट्रीयमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या पुरुष खेळाडूंच्या यादीत पहिल्या स्थानी होता. आता करणबीरने २०७ षटकारांसह पहिले स्थान गाठले आहे.
करणबीरने अवघ्या ६० टी २० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्येच रोहितला मागे टाकले आहे. त्याने ५९ डावांमध्ये ४८.८१ च्या सरासरीने २५३३ धावा केल्या आहेत. त्याने २०७ षटकारांसह ४शतके आणि २० अर्धसतके केली आहेत.
टी २० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वाधिक षटकार मारणारे खेळाडू
१) करणबीर सिंग (ऑस्ट्रिया) – २०७ षटकार (५९ डाव)
२) रोहित शर्मा (भारत) – २०५ षटकार (१५१ डाव)
३) मुहम्मद वसीम (यूएई) – १९६ षटकार (९९ डाव)
४) सूर्यकुमार यादव (भारत) – १७९ षटकार (११३ डाव)
५) जोस बटलर (इंग्लंड) – १७५ षटकार (१४३ डाव)
ऑस्ट्रिया विरुद्ध हंगेरी सामन्यामधील विक्रम
हंगेरीविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी २० मालिकेतील अंतिम सामन्यात ऑस्ट्रियाने विक्रमी धावसंख्या रचली. ऑस्ट्रियाने प्रथम फलंदाज करताना २० षटकांत ७ विकेट्स गमावत ३२२ धावा केल्या. त्यामध्ये करणबीरच्या १६४ आणि अबिदुल्लाह कोटवाच्या ९३ धावांचा समावेश आहे. ऑस्ट्रियाने केलेली ही टी २० आंतरराष्ट्रीय सामन्यांमधील दुसऱ्या क्रमांकाची सर्वोच्च धावसंख्या ठरली. हा सामना ऑस्ट्रियाने १५७ धावांनी जिंकला.
टी २० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वोच्च धावसंख्येचा विक्रम झिम्बाब्वेच्या नावावर आहे. त्यांनी २०२४ मध्ये गाम्बियाविरुद्ध ३४४ धावा केल्या होत्या.






