दिल्ली। कर्नाटक संघाने सौराष्ट्राविरुद्ध ४१ धावांनी विजय मिळवून तिसऱ्यांदा विजय हजारे ट्रॉफीवर नाव कोरले आहे. कर्नाटकडून कृष्णप्पा गॉथम आणि प्रसिध कृष्णाने प्रत्येकी ३ विकेट्स घेऊन विजयात महत्वाची कामगिरी बजावली. मात्र सौराष्ट्राचा कर्णधार चेतेश्वर पुजाराने केलेले अर्धशतक संघाला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरले.
कर्नाटकने मयंक अग्रवालच्या अर्धशतकाच्या जोरावर सौराष्ट्रासमोर २५५ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना सौराष्ट्राची सुरुवात खराब झाली. समर्थ व्यास(१व) आणि धर्मेंद्र जडेजा(१) हे दोघही लवकर बाद झाले. त्यानंतर अवी बारोट(३०) आणि कर्णधार पुजारामध्ये चांगली भागीदारी रंगली. पण जोडी फोडण्यात स्टुअर्ट बिन्नीला यश आले. त्याने बारोटला बाद केले.
यानंतर मात्र एकाही सौराष्ट्राच्या फलंदाजाला कर्णधार पुजाराची साथ देता आली नाही. अखेरच्या काही षटकात संयमी खेळणाऱ्या पुजाराने आक्रमक खेळ करत सौराष्ट्राच्या विजयाच्या आशा पल्लवित केल्या होत्या. मात्र त्याला ४५ व्या षटकात कर्नाटकचा कर्णधार करुण नायरने धावबाद केले. पुजाराने १२७ चेंडूत ९४ धावांची एकाकी लढत दिली. त्याने या खेळीत १० चौकार आणि १ षटकार मारले.
सौराष्ट्राच्या अन्य फलंदाजांपैकी रवींद्र जडेजा(१५), प्रेरक मंकड(०), अर्पित वासवद(०), चिराग जानी(२२), जयदेव उनाडकट(०), कमलेश मकवाना(२०*) आणि शौर्य सानंदिया(७) यांनी धावा केल्या. तर कर्नाटकडून कृष्णप्पा गॉथम(२७/३), प्रसिध कृष्णा(३/३७), स्टुअर्ट बिन्नी(१/३७) आणि पवन देशपांडे(१/१३) यांनी विकेट्स घेऊन सौराष्ट्राचा डाव ४६.३ षटकात २१२ धावांवर संपुष्टात आणला.
तत्पूर्वी कर्नाटकडून अफलातून फॉर्ममध्ये असणाऱ्या मयंक अग्रवालने आजही अर्धशतक केले. त्याने या स्पर्धेत ८ सामन्यात ९०.३७च्या सरासरीने ७२३ धावा केल्या आहेत. त्याने आज ७९ चेंडूत ११ चौकार आणि ३ षटकारांच्या साहाय्याने ९० धावा केल्या. त्याला रविकुमार समर्थने भक्कम साथ दिली.
समर्थने आज ६५ चेंडूत ४८ धावा केल्या. तसेच कर्नाटककडून पवन देशपांडेने देखील चांगली लढत देताना ६० चेंडूत ४९ धावांची खेळी केली. सुरवातीला कर्नाटकही संघर्ष करत होता. त्यांचे केएल राहुल आणि कर्णधार करुण नायर हे दोघेही शून्य धावेवर बाद झाले होते.
बाकी फलंदाजांकडून स्टुअर्ट बिन्नी(५), श्रेयस गोपाळ(३१), कृष्णप्पा गॉथम(९), श्रीनाथ अरविंद(१३), प्रदीप टी(१*) आणि प्रसिध कृष्णा(०) यांनी धावा केल्या. तसेच सौराष्ट्राकडून कमलेश मकवाना(४/३४), प्रेरक मंकड(२/५४), धर्मेंद्रसिंग जाडेजा आणि शौर्य सानंदिया यांनी विकेट्स घेऊन कर्नाटकला सर्वबाद २५४ धावांवर रोखले होते.
हा सामना कर्नाटकचा गोलंदाज श्रीनाथ अरविंदचा कारकिर्दीतील शेवटचा सामना होता. त्याने ५६ प्रथम श्रेणी सामन्यात १८६ विकेट्स तर लिस्ट अ क्रिकेटमध्ये ४१ सामन्यात ५७ विकेट्स घेतल्या आहेत. तसेच त्याने भारताकडून एक टी २० सामना खेळाला असून यात १ विकेट घेतली आहे. त्याने हा सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध धर्मशाला येथे २०१५ मध्ये खेळला होता.
कर्नाटकने या आधी २०१३-१४ आणि २०१४-१५ मध्ये विजय हजारे ट्रॉफी जिंकली होती.
https://twitter.com/Maha_Sports/status/968442509381849088
Karnataka win the #VijayHazare title and Sreenath Arvind ends his domestic career on a winning note as he announces his retirement from First-class and List A cricket. pic.twitter.com/hKhs6squup
— BCCI Domestic (@BCCIdomestic) February 27, 2018