दिल्ली। कर्नाटक संघाने आज विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेतील उपांत्य सामन्यात महाराष्ट्र संघाला ९ विकेट्सने पराभूत करून अंतिम फेरीत धडाक्यात प्रवेश केला आहे. कर्नाटकडून मयंक अग्रवाल आणि करूण नायर या दोघांनीही अर्धशतकी खेळी करून कर्नाटकच्या विजयात महत्वाची कामगिरी केली.
महाराष्ट्राने कर्नाटक समोर ५० षटकात जिंकण्यासाठी १६१ धावांचे आव्हान ठेवले होते. हे आव्हान कर्नाटकने फक्त एका विकेटच्या मोबदल्यात पूर्ण केले. कर्नाटकची सुरुवात अग्रवाल आणि नायर या दोन्ही सलामीवीर फलंदाजांनी दमदार करताना १५५ धावांची दीडशतकी भागीदारी रचली.
कर्नाटक विजयाच्या समीप असताना अग्रवालला सत्यजित बछावने बाद केले. अग्रवालने आज ८६ चेंडूत ८१ धावांची धावांची खेळी केली. या खेळीत त्याने ८ चौकार आणि १ षटकार मारला.
अग्रवाल बाद झाल्यावर नायर आणि रवीकुमार समर्थ(३*) यांनी कर्नाटकाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. नायरने आज अग्रवालची भक्कम साथ देताना १० चौकारांच्या साहाय्याने ९० चेंडूत नाबाद ७० धावा केल्या.
तत्पूर्वी महाराष्ट्राने ५० षटकात सर्वबाद १६० धावा केल्या. महाराष्ट्राकडून फक्त श्रीकांत मुंढेने अर्धशतक केले. त्याने ७७ चेंडूत ५० धावांची खेळी केली. तसेच नौशाद शेख(४२), राहुल त्रिपाठी(१६) आणि अंकित बावणे(१८) यांनी थोडीफार लढत दिली पण बाकी फलंदाजांना दोन आकडी धावसंख्याही गाठता आली नाही.
कर्नाटकडून कृष्णप्पा गॉथम(३/२६), प्रसिद्ध कृष्ण(२/२६), रोहित मोरे(१/२४),श्रेयश गोपाळ(१/२६) आणि प्रदीप टी(१/३८) यांनी विकेट्स घेतल्या.