भारताचा क्रिकेटपटू केदार जाधव फलंदाजीबरोबरच अनेकदा गोलंदाजी करताना दिसतो. पण त्याची गोलंदाजी शैली ही विचित्र प्रकारची आहे. त्यामुळे अनेकदा त्याला चाहते ट्रोलही करतात. पण केदारने त्याच्या गोलंदाजी शैलीचे श्रेय एमएस धोनी आणि अनिल कुंबळेला दिले आहे.
त्याने म्हटले आहे की धोनीने दाखवलेल्या विश्वासामुळे आणि कुंबळेने दिलेल्या सल्ल्यामुळे त्याच्या गोलंदाजीत सुधारणा झाली. याबद्दल त्याने चेन्नई सुपर किंग्सच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन चर्चा करताना सांगितले आहे.
केदार म्हणाला, ‘२०१६ ला ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये मला न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेसाठी निवडण्यात आले होते. त्यावेळी एमएस धोनी संघाचा कर्णधार होता. त्याने मला काही षटके गोलंदाजी करण्यास सांगितली होती. मी ऑफ स्पिन टाकायला सुरुवात केली. पार्टटाईम गोलंदाजांविरुद्ध फलंदाज जास्त धावा करण्याचा प्रयत्न करतात. काही षटके गोलंदाजी केल्यानंतर मला कंटाळा यायला लागला कारण माझ्याविरुद्ध सर्वजण आक्रमण फलंदाजी करत होते.’
‘त्यानंतर मी राऊंड आर्म गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी अनिल कुंबळे प्रशिक्षक होते. जेव्हा मी पहिला चेंडू नेटमध्ये टाकला, त्यावेळी अमित मिश्रा फलंदाजी करीत होता. मिश्राला वाटले की चेंडू वाईड असेल म्हणून त्याने चेंडू सोडला. चेंडू स्टम्पसमोर पडला आणि तो एलबीडब्ल्यू झाला.’
पुढे केदार म्हणाला, ‘यानंतर मी अनिल भाईला विचारले. त्यांनी मला गोलंदाजी करण्यास सांगितले. हा सामना धरमशालेत होत होता आणि चेंडू खूप खाली रहात होता आणि फलंदाजांना शॉट खेळण्यात त्रास होत होता. त्यावेळी अनिल भाई म्हणाले की, मी अशी गोलंदाजी करू शकतो, यामुळे माझा आत्मविश्वास वाढला. पहिल्या षटकानंतर मी राऊंड आर्म गोलंदाजी करत चेंडू टाकला आणि त्या चेंडूवर जिमी नीशम आऊट झाला.’
त्याचबरोबर केदार म्हणाला, ‘मला धोनीने विश्वास दिला, मी त्यावेळी देशांतर्गत क्रिकेटमध्येही गोलंदाजी केली नव्हती. धोनीने माझ्यावर गोलंदाज म्हणून विश्वास दाखवला.’
ट्रेंडिंग घडामोडी –
गरीब मुलांच्या मदतीला धावुन आला केएल राहुल, करणार ही मदत
पुणे वाॅरियर्स व रायझिंग पुणे सुपरजायंट्सकडून खेळलेले ३ खेळाडू
२०२१मध्ये धोनीचे आयपीएल शिवाय ही महत्त्वाची स्पर्धा खेळणे जवळपास पक्के