भारतात सध्या देशांतर्गत क्रिकेटमधील प्रसिद्ध स्पर्धा, विजय हजारे ट्रॉफीचा थरार सुरू आहे. या स्पर्धेच्या चौथ्या फेरीतील एक सामना शनिवारी (२७ फेब्रुवारी) महाराष्ट्र विरुद्ध दिल्ली संघात झाला. या सामन्यात भारतीय क्रिकेटपटू केदार जाधव याने अफलातून खेळी केली. आयपीएल २०२० मधील खराब प्रदर्शनामुळे टीका झालेल्या जाधवने विजय हजारे ट्रॉफीतील दमदार कामगिरीने टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिले आहे.
जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियममध्ये झालेल्या या सामन्यात नाणेफेकीचा निकाल महाराष्ट्राच्या बाजूने लागला. परंतु सुरुवातीच्या १५ षटकातच कर्णधार ऋतुराज गायकवाड आणि यष्टीरक्षक विशांत मोरे यांच्या रुपात महाराष्ट्राला २ धक्के बसले. मात्र चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या जाधवने संघाचा डाव सावरला.
कौतुकास्तद १०६.१७ च्या स्ट्राईकने दिल्लीच्या गोलंदाजांची धुलाई करत त्याने ८६ धावा चोपल्या. या खेळीदरम्यान त्याने ८१ चेंडूंचा सामना केला आणि सोबतच १० चौकार मारले. अखेर सीमरजीत सिंगने प्रदीप संगवानच्या हातून त्याला झेलबाद केले. या सामन्यापुर्वीही राजस्थानविरुद्ध झालेल्या सामन्यात त्याने नाबाद १०१ धावांची तूफानी खेळी केली होती.
हाच जाधव मागील वर्षी आयपीएलच्या चेन्नई सुपर किंग्सचा सदस्य होता. परंतु एमएस धोनी कर्णधार असलेल्या चेन्नईने आयपीएल २०२१ च्या लिलावापुर्वी त्याला मुक्त केले होते. त्यानंतर लिलावाच्या पहिल्या फेरीत जाधवला कुणीही खरेदीदार मिळाला नाही. परंतु दुसऱ्या फेरीत सनरायझर्स हैदराबाद संघाने २ कोटी रुपयांची बोली लावत त्याला आपल्या संघात सामील करून घेतले. अशात विजय हजारे ट्रॉफीतील प्रदर्शनाचा त्याला येत्या आयपीएलच्या चौदाव्या हंगामात चांगला फायदा होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
तब्बल २ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर ‘युनिव्हर्स बॉस’चे पुनरागमन, विंडीज टी२० संघात मिळाली जागा