हैद्राबाद। भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात शनिवारी(2 मार्च) पहिला वनडे सामना पार पडला. या सामन्यात भारताने 6 विकेट्सने विजय मिळवत 5 सामन्याच्या वनडे मालिकेत 1-0 अशा फरकाने आघाडी घेतली आहे.
या सामन्यात भारताकडून केदार जाधवने 87 चेंडूत नाबाद 81 धावा केल्या. या खेळीत केदारने 9 चौकार आणि 1 षटकार मारले. तर एमएस धोनीने 72 चेंडूत 1 षटकार आणि 6 चौकारांच्या सहाय्याने नाबाद 59 धावा केल्या.
त्याचबरोबर या दोघांनी भारताची आवस्था 4 बाद 99 अशी झाल्यानंतर संघाचा डाव सांभाळत पाचव्या विकेटसाठी नाबाद 141 धावांची भागीदारी रचली आणि भारताला विजय मिळवून दिला.
या सामन्यानंतर केदारने धोनीचे कौतुक करताना त्याचे संघात असणे महत्त्वाचे असल्याचे सांगितले आहे. केदारला या सामन्याचा सामनावीर पुरस्कारही देण्यात आला.
त्यावेळी बोलताना केदार म्हणाला, ‘जर धोनी तिथे नसता तर मी लवकर काही मोठे फटके मारण्याचा प्रयत्न केला असता. पण हीच गोष्ट तो बरोबर कशी ते सांगतो, तो तूमच्या मनातले वाचू शकतो.’
‘बऱ्याचदा जेव्हा तूम्हाला वाटते की तूम्ही या चेंडूवर बाउंड्री मारु शकता, त्यावेळी तो तूम्हाला सांगतो, ‘मला ते माहित आहे. पण संघाला मजबूतपणा हवा आहे आणि तूला शेवटपर्यंत फलंदाजी करायची आहे.’ प्रत्येकवेळी तूम्ही संघाचा विचार करता तेव्हा बऱ्याचवेळा तूम्ही विजय मिळवता.’
याआधीही जानेवारीमध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील मेलबर्नमध्ये झालेल्या तिसऱ्या वनडे सामन्यात केदार आणि धोनीने 121 धावांची नाबाद भागीदारी करत भारताला विजय मिळवून दिला होता.
त्याचीही आठवण करुन देताना केदार म्हणाला, ‘काही दिवसांपूर्वीच ऑस्ट्रेलियामध्ये आम्ही असेच आव्हानाचा पाठलाग केला होता. ती घटना माझ्या मनात होती. जेव्हा दुसऱ्या बाजूला माही भाई असतो, तेव्हा तूम्ही फक्त त्याचे ऐका, मी आज तेच केले. मी त्याच्याकडून खूप काही शिकण्याचा प्रयत्न करतो.’
त्याचबरोबर केदारने विराट कोहली आणि धोनीचे कौतुक करताना म्हटले आहे की ‘धोनी आणि विराट हे आव्हानाचा पाठलाग करताना सर्वोत्तम आहेत. त्यांची जी प्रत्येक वेळी तीव्रता असते. हेच आम्ही कर्णधाराकडून शिकतो आणि तेच करण्याचा प्रयत्न करतो.’
शनिवारी झालेल्या या वनडे सामन्यात केदारने फलंदाजी बरोबरच गोलंदाजी करतानाही मार्कस स्टॉयनिसला बाद केले होते. त्यामुळे त्याच्या गोलंदाजीबद्दल बोलताना केदार म्हणाला, ‘माझी गोलंदाजी ही फलंदाजांचे मनात काय चालू आहे त्यावर अवलंबून आहे. माझ्याकडे वेगवेगळ्या अँगलने चेंडू टाकण्याचे दोन ते तीन पर्याय आहेत.
‘माझ्या गोलंदाजीतील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे मी गोलंदाज आहे, असा कधीही विचार करत नाही. त्यामुळे माझ्यावर जास्तीची जबाबदारी नसते. मी माझ्या गोलंदाजीची मजा घेतो.’
महत्त्वाच्या बातम्या-
–एकवेळ बीसीसीआयने नाकारलेला कुंबळे आता थेट आयसीसीत
–राजकोट बाॅय रविंद्र जडेजाच्या पत्नीचा भारतीय जनता पक्षात प्रवेश
–धोनी जे काही करायला सांगतो ते मी डोळे झाकून करतो – केदार जाधव