गोवा: इंडियन सुपर लीगच्या (आयएसएल) यंदाच्या पर्वाचा अंतिम टप्पा आता सुरू झाला आहे आणि त्यामुळे उपांत्य फेरीत आपापले स्थान पक्के करण्याची चुरसही रंगताना दिसतेय. केरला ब्लास्टर्स एफसी व चेन्नईयन एफसी यांच्यातल्या लढतीत तिच ठसन पाहायला मिळणार आहे. पाचव्या स्थानी असलेल्या केरला ब्लास्टर्सला आता एकही गुण गमावणे परवडणारे नाही. त्यामुळे टिळक मैदान स्टेडियमवर होणाऱ्या लढतीत चेन्नईयनविरुद्ध विजय मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असणार आहे.
केरला ब्लास्टर्सला मागील सामन्यात हैदराबाद एफसीकडून पराभव पत्करावा लागला आणि त्यांना १७ सामन्यानंतर २७ गुणांसह पाचव्या स्थानी घसरावे लागले होते. मुंबई सिटी एफसी २८ गुणांसह चौथ्या स्थानी सरकले आहेत आणि शनिवारी त्यांचा सामना दुबळ्या एफसी गोवाविरुद्धशी होणार आहे. त्यामुळे केरला ब्लास्टर्स चेन्नईयनला पराभूत करून पुन्हा टॉफ फोअरमध्ये प्रवेश करण्यासाठी प्रयत्नशील आहे.
हैदराबादच्या संघाने ३५ गुणांसह उपांत्य फेरीतील प्रवेश पक्का केला आहे आणि आता उर्वरित तीन स्थानांसाठी जमशेदपूर एफसी व एटीके मोहन बागान प्रत्येकी ३१ गुणांसह आघाडीवर आहेत. जमशेदपूरच्या हातात आणखी दोन सामने आहेत. ”आम्ही गोल करण्याच्या संधी निर्माण करण्यासाठी अथक मेहनत घेत आहोत, परंतु नशीब हाही महत्त्वाचा भाग आहे आणि पुढील सामन्यांत त्याचीच साथ आम्हाला हवी आहे,”असे इव्हान व्हुकोमॅनोव्हिच यांनी सांगितले.
अल्वारो व्हॅझक्यूज हा चांगल्या फॉर्मात आहे आणि त्याने हैदराबाद एफसीविरुद्धच्या सामन्यात दुसऱ्या हाफमध्ये त्याचा क्लास पुन्हा एकदा दाखवून दिला आहे. पण, शनिवारच्या सामन्यात निशू कुमार व जॅकसन सिंग यांच्या खेळण्यावर संभ्रम असल्याचे, व्हुकोमॅनोव्हिच यांनी सांगितले. जॉर्ज डाएझ हा मागच्या सामन्यात खेळला नव्हता. त्याच्यावर एका सामन्याची बंदी घातली गेली होती. व्हुकोमॅनोव्हिच म्हणाले,”सराव सामन्यात त्याच्यावर आमचे लक्ष असेल आणि त्यानंतर अंतिम निर्णय घेतला जाईल. आम्हाला कोणताचा धोका पत्करायचा नाही आणि लीगच्या या टप्प्यात खेळाडूला दुखापतीमुळे गमवावे लागेल, हा धोका पत्करू शकत नाही. त्यामुळे आम्हाला काळजीपूर्वक निर्णय घ्यावा लागेल.”
चेन्नईयन एफसी उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर फेकला गेला आहे, परंतु प्रशिक्षक सबीर पाशा यांनी आता स्वाभीमानासाठी खेळण्याचा निर्धार बोलून दाखवला आहे. चेन्नईयनला मागील सहा सामन्यांत एकही विजय मिळवता आलेला नाही. या सहा सामन्यांत २ अनिर्णित निकाल आणि चार पराभव झाले आहेत. त्यामुळे पुन्हा विजयी ट्रॅकवर परतण्याचा चेन्नईयनचा प्रयत्न आहे. मागील सहा सामन्यांत बचावातील त्रुटी त्यांना महागात पडल्या आहेत. मागील सहापैकी ५ सामन्यांत चेन्नईयनने किमान २ गोल खाल्ले आहेत.
”हंगामाचा शेवट विजयाने करणे हे प्रेरणादायी ठरू शकते. प्रत्येक सामना हा स्पर्धात्मक आहे आणि प्रोफेशनल खेळाडू म्हणून सर्व सामन्यांत सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न झाला पाहिजे,”असे पाशा म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या-
द्रविड-गांगुलीसोबतली चर्चा उघड करणे वृद्धिमान सहाला पडणार महागात? बीसीसीआय घेऊ शकते मोठा निर्णय
‘कर्णधार’ रोहित शर्माचा मुंबई क्रिकेट असोसिएशनकडून होणार मोठा सन्मान, कारणही आहे खास