गोवा: हिरो इंडियन सुपर लीगच्या (आयएसएल) दुसऱ्या टप्प्यातील महत्त्वपूर्ण लढतीत बुधवारी (१० फेब्रुवारी) केरला ब्लास्टर्स एफसीसमोर जमशेदपूर एफसीचे आव्हान आहे.
मागील चार सामन्यांत तीन विजय मिळवलेला केरला संघ १३ सामन्यांतून २३ गुणांनिशी आठव्या हंगामात पॉइंट्स टेबलमध्ये दुसऱ्या स्थानी आहे. अव्वल स्थानी असलेल्या हैदराबाद एफसी आणि त्यांच्यामध्ये केवळ एका विजयाचा (३ गुण) फरक आहे. मागील लढतीत नॉर्थ ईस्ट युनायटेड एफसीवर २-१ अशी निसटती मात करून विजयीपथावर परतले तरी केरलासमोर जमशेदपूरला रोखण्याचे आव्हान आहे. दुसरीकडे, बंगलोर एफसीकडून तीन विजयांची मालिका खंडित झाली तरी पाचव्या स्थानी असलेल्या जमशेदपूरच्या खात्यात १३ सामन्यांतून २२ गुण आहेत. मात्र, पराभवातून बोध घेत पुन्हा विजयीमार्गावर परतू, असा विश्वास मुख्य प्रशिक्षक ओवेन कॉयल यांनी व्यक्त केला आहे.
मागील हंगामात केरला ब्लास्टर्सला आघाडी घेऊनही विजय मिळवण्यात अपयश आले होते. मात्र, यंदाच्या हंगामात त्यांनी अनेक कमकुवत बाबींवर विजय मिळवला आहे. इव्हान वुकोमॅनोविक यांच्या मार्गदर्शनाखालील केरलाने सातव्या हंगामाच्या तुलनेत आठव्या हंगामात सामना जिंकण्याच्या स्थितीचा अभ्यास करता केवळ दोन गुण गमावलेत. त्यामुळे यंदा त्यांना बऱ्यापैकी सातत्य राखता आलेले आहे. त्यात स्पेनचा स्ट्रायकर अल्वॅरो वॅझकेझचे मोठे योगदान राहिले आहे.
जमशेदपूर एफसीसाठी डॅनियल चिमा चुक्वुचा खेळ महत्त्वपूर्ण ठरू शकतो. बंगलोर एफसीविरुद्ध त्याने ४६व्या सेकंदाला केलेला गोल २०२१-२२ हंगामातील दुसरा सर्वात वेगवान गोल ठरला. अर्थात सुरुवातीची आघाडी राखण्यात जमशेदपूरला अपयश आले, हा भाग वेगळा. त्यामुळे टॉप दोन टीममध्ये असलेल्या केरला ब्लास्टर्सविरुद्ध अधिक वेगळ्या रणनीतीने आम्हाला खेळावे लागेल. मागील सामन्यातील चुका सुधारताना पूर्णपणे तीन गुण वसूल करताना अव्वल चार संघांत स्थान मिळवण्याचा आम्ही प्रयत्न करू, असे प्रशिक्षक कॉयल यांनी म्हटले आहे.
जमशेदपूरविरुद्धची लढत सोपी नसेल, असे केरलाचे कोच वुकोमॅनोविक यांना वाटते. प्रतिस्पर्धी संघ मजबूत आहे. मात्र, आम्ही चांगला सराव केला आहे. आम्हाला आमच्या चाहत्यांना खूष करायचे आहे, असे त्यांनी पुढे म्हटले