गोवा। सातव्या हिरो इंडियन सुपर लिग फुटबॉल स्पर्धेत (आयएसएल) बुधवारी बांबोळी येथील जीएमसी स्टेडियमवर केरला ब्लास्टर्स आणि जमशेदपूर एफसी यांच्यात लढत होत आहे. दोन्ही संघांसाठी या लढतीत खूप काही पणास लागलेले असेल.
दोन्ही संघ 13 सामने झाल्यानंतर गुणतक्त्यात तळाच्या भागात आहेत. त्यांचे गुण सारखे आहेत. ब्लास्टर्सचा नववा, तर जमशेदपूरचा आठवा क्रमांक आहे. पहिल्या चार क्रमांकांमध्ये स्थान मिळविण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या या संघांना बऱ्याच प्रश्नांनी त्रस्त केले आहे.
ब्लास्टर्सकरीता गोल पत्करावे लागणे ही मुख्य समस्या आहे. त्यांच्याविरुद्ध सर्वाधिक 22 गोल झाले आहेत. आधीच्या 10 सामन्यांत त्यांना एकच क्लीन शीट नोंदविता आली आहे. दुखापतींमुळे बचाव फळीत सारखे बदल करावे लागणे यास कारणीभूत ठरले असावे.
ब्लास्टर्सचे सहाय्यक प्रशिक्षक इश्फाक अहमद यांना यापुढील वाटचालीत जास्त क्लीन-शीटची आशा आहे. मुख्य प्रशिक्षक किबू व्हिकुना निलंबीत असल्यामुळे संघाची सुत्रे त्यांच्याकडे असतील.
अहमद यांनी सांगितले की, आम्ही दोन क्लीन-शीट नोंदविल्या आहेत. याचे कारण इतर संघ सुद्धा फुटबॉल खेळतात आणि त्यांना गोल करायचे असतात. मोसमाच्या पहिल्या टप्प्यात आमची सुरुवात चांगली नव्हती हे आम्हाला ठाऊक आहे. अनेक सामन्यांत आम्हाला काही महत्त्वाच्या खेळाडूंना मुकावे लागले, पण आता हा इतिहास आहे. आम्ही आता खेळात सुधारणा केली आहे. आमचा संघ आणि गोलरक्षक अल्बिनो गोम्स यांनी नेहमीच क्लीन-शीटचे एकत्रित ध्येय ठेवले आहे. त्यामुळे तुम्हाला विजेतेपद जिंकता येऊ शकते. अल्बिनो प्रयत्न करतो आहे आणि तो त्याच्यापुढील जबाबदारी पार पाडतो आहे. संपूर्ण संघ त्याला पाठिंबा देईल अशी आशा आहे. त्यामुळे आम्ही मोसमाअखेरीस जास्त क्लीन-शीट नोंदवू शकलेलो असू अशी आशा आहे.
नेहमीच गोल पत्करावे लागले असले तरी ब्लास्टर्सकरीता प्रतिस्पर्ध्याच्या गोल क्षेत्रातील निर्णायक कामगिरी त्यांना अभिमान वाटावी अशी आहे. केवळ मुंबई सिटी आणि एफसी गोवा या दोनच संघांनी त्यांच्यापेक्षा जास्त गोल केले आहेत. याशिवाय ब्लास्टर्सकडून नऊ खेळाडूंनी गोल केले आहेत, जे सहभागी संघांमध्ये सर्वाधिक प्रमाण आहे.
दुसरीकडे जमशेदपूर हा संघ गोल करण्याच्या बाबतीत सर्वाधिक सक्षम संघांमध्ये राहिलेला नाही. त्यांना केवळ 13 गोल करता आले आहेत, जी तळाच्या भागातील ईस्ट बंगालच्या साथीत शेवटून तिसऱ्या क्रमांकाची कामगिरी आहे.
मागील सामन्यात त्यांना हैदराबाद एफसीविरुद्ध गोल करण्यासाठी झगडावे लागले आणि अखेरीस गोलशून्य बरोबरीवर समाधान मानावे लागले. ओवेन कॉयल यांच्या संघासाठी एक मुद्दा मात्र महत्त्वाचा ठरला आणि तो म्हणजे त्यांनी प्रदर्शित केलेला आक्रमक दृष्टिकोन.
कॉयल यांनी सांगितले की, फारुख चौधरी आणि सैमीनलेन डुंगल असे नवे खेळाडू आल्यामुळे त्यांनी आगेकूच करण्याच्यादृष्टिने बरीच चालना दिली. हैदराबादविरुद्ध हे ठळकपणे दिसले. ही खरोखरच मोठी सकारात्मक बाब आहे. आमच्याकडे जास्त आक्रमक दृष्टिकोनाचा संघ असल्याचे दिसून आले. या संघाला तीन गुणांसाठी प्रयत्न करायचा होता आणि फॉर्मात यायचे होते.
दोन्ही संघांच्या मागील लढतीत पाच गोलांचा थरार झाला होता, ज्यात ब्लास्टर्सची सरशी झाली होती. आता बुधवारी खुप काही पणास लागले असताना हे चित्र आणखी मोठ्या प्रमाणावर दिसण्याची अपेक्षा आहे.