गोवा: प्ले-ऑफ फेरीत अप्रतिम खेळ करताना केरला ब्लास्टर्स एफसीने हिरो इंडियन सुपर लीगच्या (आयएसएल) अंतिम फेरीत धडक मारली. उपांत्य फेरीतील परतीच्या लेगमधील जमशेदपूर एफसीविरुद्धची लढत १-१ अशी बरोबरीत सुटली तरी पहिल्या लेगमधील (१-०) विजयासह २-१ अशा फरकाने फायनल प्रवेश केला. अड्रियन लुना याचा गोल केरलासाठी महत्त्वपूर्ण ठरला. त्यांनी आयएसएलमध्ये तिसऱ्यांदा अंतिम फेरी गाठली. दुसरीकडे, साखळी फेरी गाजवणाऱ्या लीग शील्ड विजेत्या जमशेदपूरचे आव्हान संपुष्टात आले.
टिळक मैदानावर झालेल्या सेमीफायनल टू सेकंड लेग सामन्यात पिछाडीवर पडलेल्या जमशेदपूरची प्रतिष्ठा पणाला लागली होती. पहिल्या लेगमधील निसटता विजय असला तरी केरला ब्लास्टर्सचा आत्मविश्वास उंचावला होता. १८व्या मिनिटाला अड्रियन लुना याने अप्रतिम गोल करताना संघाला आघाडीवर नेले. मध्यंतरापर्यंत आघाडी राखण्यात केरलाला यश आले. मात्र, मध्यंतरानंतर पाचच मिनिटांनी प्रणय हल्दरने जमशेदपूरला बरोबरी गाठून दिली. या बरोबरीनंतर उर्वरित ४० मिनिटांमध्ये दोन्ही संघांमध्ये आघाडी घेण्यासाठी चढाई दिसली. केरलाला आणखी भर घालता आली नाही तरी पहिल्या लेगमधील विजयामुळे (१-०) त्यांनी २-१ अशा फरकाने अंतिम फेरीत प्रवेश केला.
केरला ब्लास्टर्सनी यापूर्वी, २०१४ आणि २०१६मध्ये अंतिम फेरी गाठली होती. मात्र, त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. केरला संघाला ऍट्लेटिको डी कोलकाता संघाकडून मात खावी लागली. सहा वर्षांनंतर त्यांना मागील अपयश धुवून काढण्याची संधी आहे.
ओवेन कॉयल यांच्या प्रशिक्षकपदाखालील जमशेदपूरने यंदाच्या हंगामातील साखळी फेरी गाजवली. पहिल्यांदा प्ले-ऑफ फेरी निश्चित केली. त्यानंतर आयएसएलमध्ये सर्वाधिक आणि विक्रमी गुण (२० सामन्यांत ४३ गुण) मिळवणारा संघ असे अनेक विक्रम त्यांनी आपल्या नावे केला.
सर्वाधिक १३ विजय आणि सर्वाधिक गुणांसह जमशेदपूरने मानाची आणि प्रतिष्ठेची लीग शील्ड ट्रॉफी जिंकली. मात्र, बाद फेरीत त्यांना सातत्य राखण्यात अपयश आले. दुसरीकडे, साखळीमध्ये चौथे स्थान मिळवूनही केरला ब्लास्टर्सनी प्ले-ऑफ फेरीमध्ये अप्रतिम खेळ केला. त्यात सहल समद आणि अड्रियन लुना मॅचविनर ठरले.
निकाल: केरला ब्लास्टर्स १(अड्रियन लुना १८व्या मिनिटाला) विरुद्ध जमशेदपूर एफसी १(प्रणय हल्दर ५०व्या मिनिटाला). २-१ अशा फरकासह केरला अंतिम फेरी.
महत्त्वाच्या बातम्या-
केरला ब्लास्टर्सला फायनल प्रवेशाची संधी; जमशेदपूरची प्रतिष्ठा पणाला
क्या बात है! हैदराबाद एफसीचे एक पाऊल फायनलच्या उंबरठ्यावर; एटीके मोहन बागानवर दणदणीत विजय!
आयएसएल: शील्ड विजेत्या जमशेदपूरला केरलाने रोखले; समदचा एकमेव गोल निर्णायक






