पुणे । केसरी करंडक फुटबॉल स्पर्धेच्या दुसर्या दिवशी झालेल्या सामन्यात परशुरामियन्स अ, अशोका -11, पिफा आणि चेतक फुटबॉल संघांचे विजय झाले.
या स्पर्धेच्या दुसर्या दिवशी झालेल्या फुटबॉल सामन्यांमध्ये पहिला सामना परशुरामियन्स अ संघ आणि आय.एफ.ए सॅमफोर्ड संघात चुरशीचा झाला. या सामन्यात परशुरामियन्स अ संघाच्या निखील नारायण याने पहिल्या 7 व्या मिनीटाला पहिला गोल केला. त्यानंतर 24 मिनीटाला सॅमसन जोसेफ याने दुसरा गोल केला. तसेच सोहेल शेख याने 26 मिनीटाला परशुरामियन्स अ संघासाठी तिसरा गोल केला.
त्यानंतर सॅमसन जोसेफ याने 27 मिनीटाला चौथा तर निखील पडवळ याने 32 मिनीटाला पाचवा तसेच यासीर खान याने 33 मिनीटाला सहावा गोल केला. तर सनजीत नाईक याने 48 मिनीटाला सातवा गोल केला. यासीर खान याने 57 मिनीटाला आठवा तर यासीर खान यानेच 65 मिनीटाला नववा गोल केला. त्यामुळे हा सामना 9-0 अशा फरकाने परशुरामियन्स अ संघाने जिंकला. तर आय.एफ.ए सॅमफोर्ड संघाचे मॅन्युअल पिल्ले तसेच नेल्सन पास्ते आणि शुभम पिल्ले यांनी चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न केला मात्र हे सपशेल अपयशी ठरले.
तसेच महत्वपुर्ण फुटबॉलपटू ऑलविल फ्रांसिस यालाही एकही गोल करता आला नाही. परशुरामियन्स अ संघाच्या यष्टीरक्षक रोहण फासणे याने सर्वोत्तम गोलरक्षण केले. तर अथर्व कुलकर्णी याने सर्वोत्तम डिफेंस केला.
त्यानंतर झालेल्या दुसर्या सामन्यात अशोका-11 आणि डिएगो ज्युनियर्स अ यांच्यात मोठी चुरस पाहण्यास मिळाली.
अशोका-11 संघाच्या करण गोरखा याने 45 मिनीटाला सामन्याचा पहिला आणि निर्णायक गोल केला. याच गोलाच्या बळावर हा सामना अशोका-11 संघाने 1-0 जिंकला. त्याला मजर शेख याने सर्वोत्तम पास दिला. तसेच अशोका-11 संघाच्या विक्रम रावत याने सर्वोत्तम डिफेंस केला. तर स्टिव्हन झुजार्ड आणि संकेत कामटे यांना डिएगो ज्युनियर्स अ संघाकडून खेळताना एकही गोल करता आला नाही.
त्यानंतरचा तिसरा सामना सिटी क्लब आणि पिफा यांच्यात झाला या सामन्यात पिफा संघाने 1-0 असा विजय नोंदविला.
पिफा संघाच्या अक्षय यादव याने 53 मिनीटाला पहिला आणि निर्णायक गोल केला. त्याला आशिष पांडे, तपन मेहता यांनी सर्वोत्तम साथ दिली. तर पिफा संघाचा यष्टीरक्षक़ राधेशाम याने सुरेख गोलरक्षण केले.
त्यानंतर झालेल्या अखेरच्या सामन्यात सासवड फुटबॉल क्लब आणि चेतक-अ संघात घमासान फुटबॉल युद्ध पाहण्यास मिळाले. हा सामना चेतक-अ संघाने 3-1 असा विजय नोंदविला. या सामन्यात चेतक-अ संघाच्या यश सरदेसाई याने 15 मिनीटाला पहिला गोल तर रितेष ठुबे याने 40 मिनीटाला दुसरा गोल केला तर याच संघाच्या निखील माळी याने 58 मिनीटाला तिसरा गोल करत सामन्यावर वर्चस्व गाजविले. चेतक-अ संघाचा साजन अगरवाल या यष्टीरक्षकाने सर्वोत्तम कामगिरी बजावली. तर सासवड फुटबॉल क्लब संघाच्या सौमित्र मिसाळ याने 25 मिनीटाला पेनल्टीवर एकमेव गोल केला.
निकाल- दिवस दुसरा
सामना 1 ) परशुरामियन्स अ संघ विरुद्ध आय.एफ.ए सॅमफोर्ड
परशुरामियन्स अ संघाचा 9-0 ने विजय
सामना 2) अशोका-11 विरुद्ध डिएगो ज्युनियर्स अ
अशोका-11 संघाने 1-0 जिंकला.