नुकत्याच समोर आलेल्या एक वृत्तानुसार, भारतीय क्रिकेट टीम नव्या फलंदाजी प्रशिक्षकाची नियुक्ती करण्याची शक्यता आहे. सध्या टीम इंडियाकडे अधिकृत फलंदाजी प्रशिक्षक नाही. संघात दोन सहाय्यक प्रशिक्षक आहेत जे पूर्वी फलंदाज होते, परंतु ते भारतीय संघासोबत फलंदाजी प्रशिक्षक म्हणून काम करत नाहीत. भारतीय संघाला फलंदाजी प्रशिक्षकाची आवश्यकता असल्याच्या वृत्तांदरम्यान इंग्लंडचा माजी खेळाडू केविन पीटरसन यानं तो या भूमिकेसाठी इच्छूक असल्याचं म्हटलं आहे.
पीटरसननं सोशल मीडियावर जाहीर केलं की तो भारताचा फलंदाजी प्रशिक्षक होण्यास तयार आहे. इंस्टाग्रामवर एका युजरनं भारतीय संघ फलंदाजी प्रशिक्षकाच्या शोधात असल्याचं म्हटलं होतं. यावर कमेंट करताना पीटरसननं तो या पदासाठी उपलब्ध असल्याचं जाहीर केलं. येथे नमूद करण्यासारखी बाब म्हणजे, सध्या फलंदाजी प्रशिक्षकाबाबत बीसीसीआयकडून कोणतंही अधिकृत वक्तव्य आलेलं नाही.
44 वर्षीय केविन पीटरसन त्याच्या काळातील एक अतिशय स्टायलिश फलंदाज होता. मात्र त्यानं अद्याप कोचिंगमध्ये हात आजमावलेला नाही. पीटरसननं इंग्लंडकडून एकदिवसीय आणि कसोटी फॉरमॅटमध्ये 100 हून अधिक सामने खेळले आहेत. त्याच्या नावे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 12,000 हून अधिक धावा आहेत.
पीटरसनची आंतरराष्ट्रीय कारकीर्द यशस्वी होती. त्याचा ‘स्विच हिट’ शॉट खूपच लोकप्रिय होता. सुरुवातीला त्याच्या या शॉटवरून खूप वाद झाला होता, पण आज हा शॉट क्रिकेटमध्ये मोठ्या प्रमाणात वापरला जातो. पीटरसनची फलंदाजीची शैली आणि फिटनेसवर काम करण्याची पद्धत भारतीय संघासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. इंग्लंडच्या कसोटी दौऱ्याचा विचार करता तो खूप उपयोगी ठरू शकतो. आता बीसीसीसीआय यावर काय निर्णय घेते, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
हेही वाचा –
युवराज सिंगची कारकीर्द संपवणारा नियम पुन्हा लागू होणार! बीसीसीआय अॅक्शन मोडमध्ये
हा संघ आगामी चॅम्पियन्स ट्राॅफीचा फायनल खेळणार, माजी क्रिकेटपटूची भविष्यवाणी
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सामन्याची तिकिटे चक्क इतक्या रुपयांत, पीसीबीकडून रेट कार्ड जाहीर