आयपीएल २०२० मधील दहावा सामना सोमवारी (२८ सप्टेंबर) रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध मुंबई इंडियन्स संघात झाला. हा सामना बरोबरीत सुटल्याने सुपर ओव्हर खेळण्यात आली होती. सुपर ओव्हरमध्ये बेंगलोरने हा सामना आपल्या नावावर केला. त्यानंतर आता इंग्लंडचा माजी खेळाडू केव्हिन पीटरसनने सुपर ओव्हरमध्ये युवा खेळाडू इशान किशनला फलंदाजीला न पाठवल्यामुळे मुंबईवर टीका केली आहे. त्याने मुंबईच्या रणनीतिवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. आयपीएलमध्ये समालोचन करताना पीटरसन याबाबत बोलला आहे.
पीटरसनने सुपर ओव्हरबद्दल मुंबईच्या रणनीतिवर मत व्यक्त करत म्हटले, “माझ्या मते मुंबई इंडियन्सने एक ट्रिक मिस केली आहे. लहान बाऊंड्रीमध्ये २ मिनिटे फलंदाजी करणे ही काय मोठी गोष्ट नव्हती. मी किशनवर टीका करत नाही, तर हे म्हणत आहे की त्याला सुपर ओव्हरमध्ये फलंदाजी करण्यासाठी का नाही पाठवले.”
पीटरसन सोबत होते सुनील गावसकर
भारतीय संघाचे महान माजी कर्णधार सुनील गावसकर यांनीही आपले मत व्यक्त केले आहे. ते म्हणाले की, सुपर ओव्हरदरम्यान काही योजना बनविण्यासाठी खूप वेळ नसतो. सुपर ओव्हरबद्दल बोलताना ते म्हणाले की, “जर हा ४० षटकांचा सामना असता, तर किशनने नक्कीच जाऊन फलंदाजी केली असती कारण केवळ एकच ते म्हणजे फॉर्म. माझ्या मते किशनने फलंदाजी करण्यासाठी यायला पाहिजे होते. कारण केवळ ६ चेंडूंची तर गोष्ट होती.”
रोहितने सांगितले किशनला सुपर ओव्हरमध्ये फलंदाजीला न पाठवण्याचे कारण
मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार रोहित शर्माने किशनला सुपर ओव्हरमध्ये न पाठवण्याचे कारण सांगितले आहे. त्याने म्हटले की, किशनने मोठी खेळी खेळल्यामुळे तो खूप थकला होता. सोबतच त्याने किशन आणि कायरन पोलार्डच्या फलंदाजीची प्रशंसाही केली.
सामन्यानंतर रोहित म्हणाला, “आम्ही किशनला सुपर ओव्हरमध्ये फलंदाजीला पाठवले नाही, कारण तो खूप थकला होता. आम्ही विचार केला की त्याला आपण पाठवू शकतो. परंतु त्याला ताजेतवाने वाटत नव्हते.”