भारतीय क्रिकेटपटू पृथ्वी शॉ सध्या मुंबईसाठी देशांतर्गत क्रिकेट खेळत आहे. मात्र तो आयपीएल 2025 मध्ये खेळताना दिसणार नाही. आयपीएल मेगा लिलावात शॉला कोणत्याही संघानं विकत घेतलं नाही. यामागे त्याचा फिटनेस आणि सातत्याचा अभाव हे कारण आहे.
अशा परिस्थितीत आता पृथ्वी शॉला माजी क्रिकेटपटूंचा पाठिंबा मिळत आहे. प्रत्येकजण त्याला चांगला सराव करून दमदार पुनरागमन करण्याचा सल्ला देत आहे. इंग्लंडचा दिग्गज क्रिकेटपटू केविन पीटरसननं शॉला सल्ला दिला आहे, ज्याच्याशी शेन वॉटसनही सहमत आहे. वॉटसन आणि पृथ्वी शॉ यांनी दिल्ली कॅपिटल्समध्ये एकत्र काम केलंय.
केविन पीटरसननं म्हटलं की, “जर पृथ्वी शॉच्या आजूबाजूला चांगले लोक असतील ज्यांना त्याच्या दीर्घकालीन यशाची काळजी असेल तर ते त्याला समजावतील, त्याला सोशल मीडियापासून दूर राहण्यास सांगतील आणि त्याला पूर्णपणे फिट होण्यासाठी ट्रेनिंग करायला सांगतील. यामुळे तो योग्य मार्गावर येईल आणि पुन्हा यश प्राप्त करू शकेल.”
यावर शेन वॉटसन म्हणाला की, तो केविन पीटरसनच्या मताशी पूर्णपणे सहमत आहे. “पृथ्वी शॉ हा एक विलक्षण प्रतिभावान खेळाडू आहे. भारतीय क्रिकेटचा सर्वात मोठा हिरो बनण्यासाठी जे काही आवश्यक आहे ते त्याच्याकडे आहे”, असं वॉटसननं नमूद केलं.
I completely agree @KP24
Prithvi is such a precocious talent and these are all that is required for him to turn things around and be one of Indian Cricket’s biggest heroes. 💪🏻💪🏻— Shane Watson (@ShaneRWatson33) December 4, 2024
पृथ्वी शॉच्या नेतृत्वाखाली भारतीय अंडर 19 संघानं 2018 मध्ये विश्वचषक जिंकला होता. यानंतर पृथ्वीनं आपल्या कसोटी पदार्पणातच शतक झळकावलं होतं. मात्र कालांतरानं त्याला भारतीय संघाकडून फारशा संधी मिळाल्या नाहीत. पृथ्वी 6 वर्ष दिल्ली कॅपिटल्सकडून खेळला. परंतु खराब फॉर्ममुळे त्याला रिलिज करण्यात आलं आणि तो लिलावातही अनसोल्ड राहिला. नुकत्याच झालेल्या मेगा लिलावात पृथ्वीची मूळ किंमत 75 लाख रुपये होती. मात्र एकाही संघानं त्याच्यात रस दाखवला नाही.
हेही वाचा –
दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी संघाची घोषणा; वनडे, टी20 सह कसोटी मालिकाही खेळवली जाणार
दे चौका, दे छक्का! नेपाळ प्रीमियर लीगमध्ये शिखर धवनचा धुमधडाका
IND VS AUS; दुसऱ्या कसोटीपूर्वी WTC गुणतालिकेत पुन्हा फेरबदल, या संघाचा मोठा फायदा